Andhra Pradesh 3rd and 4th child financial : घटत्या लोकसंख्येची स्थिती सुधारण्यासाठी संबंधित सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जोडप्याला तिसऱ्या अपत्यासाठी ३० हजार तर, चौथ्या अपत्यासाठी ४० हजार रुपयांचं आर्थिक प्रोत्सहन मिळणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायड यांनी शुक्रवारी याबाबत जाहीर केलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न
शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नपेटा येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना नायडू म्हणाले की, सरकारने हा निर्णय घेतला असून एका महिन्याच्या आत अधिक तपशील जाहीर केला जणार आहे. ते म्हणाले, मी एक नवीन निर्णय घेतला आहे. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आम्ही तत्काळ ३० हजार रुपये आणि चौथ्या मुलासाठी ४० हजार रुपये देऊ. हा योग्य निर्णय नाही का?” असं नायडू स्वर्णआंध्र स्वच्छ आंध्र स्वच्छता कार्यक्रमात म्हणाले. एकेकाळी लोकसंख्या नियंत्रणाच्या उपयांचं समर्थन केलं असलं तरीही आता जन्मदर वाढवण्यासाठी समाजाने एकत्र काम करण्याची वेळ आलीय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी २५ हजार रुपयांचं प्रोत्सहन देण्याची त्यांनी आधी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या अपत्याच्या जन्मासाठी नवी योजना जाहीर केली. ५ मार्च रोजी त्यांनी विधानसभेला माहिती दिली होती की दुसरं अपत्य होणाऱ्या जोडप्यांना २५ हजार रुपयांचं प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.
मुलं म्हणजे संपत्ती
नायडू यांच्या मते बदलत्या सामाजिक आणि आर्थिक प्रवृत्ती कुटुंबाच्या आकारावर परिणाम करत आहेत. उत्पन्न वाढल्यामुळे काही जोडपी एकाच अपत्याला पसंती देत आहेत, तर काही जण त्यांचे पहिले अपत्य मुलगा नसल्यास दुसऱ्या अपत्याचा विचार करतात. त्यामुळे लोकसंख्या वाढीत घट होत आहे. मुले ओझे असतात ही कल्पना फेटाळून लावत नायडू म्हणाले की मुले ही एक संपत्ती आहेत आणि ते हे सिद्ध करून दाखवतील.
