आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील श्री सिटीमधील औद्योगिक परिसरात शनिवारी सकाळी एका फार्मास्युटिकल कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान चार कामगारांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्यामुळे इमारतीच्या छताचा काही भाग खाली कोसळला. परिणामी, तिथे काम करणारे काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

रात्रीची शिफ्ट संपवण्याच्या तयारीत असतानाच स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीची शिफ्ट संपवून कामगार बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच अचानक बॉयलरचा जोरदार स्फोट झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली. या स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली आणि इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली  आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर सध्या नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

श्री सिटीमध्ये २५० हून अधिक कंपन्या

राष्ट्रीय महामार्ग १६ जवळ असलेले श्री सिटी हे भारतातील मोठ्या बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. या औद्योगिक परिसरात २५० हून अधिक कंपन्या असून त्यामध्ये अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांचाही समावेश आहे. बॉयलरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

वर्षभरात आंध्र प्रदेशात अनेक औद्योगिक दुर्घटना

जूनमध्ये ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पा’मध्ये वितळलेलं स्टील वाहून नेणारी ‘लॅडल’ तुटल्याने मोठी आग लागली होती. या दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये काकीनाडा जिल्ह्यातील वेटलापालेम गावातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील रायावरम येथील फटाके बनवण्याच्या युनिटमध्ये स्फोट झाला होता. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. श्री सिटीमधील ताज्या दुर्घटनेनंतर औद्योगिक युनिट्समधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.