Andhra Pradesh School Chainsaw Attack News Update: आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्तडू येथील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी एका माथेफिरूने दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गात घुसून यांत्रिक करवतीने भीषण हल्ला केला, यामुळे ती विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. या वर्गातील हल्ल्यातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत तो पीडितेचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, शाळेत दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे काही शिक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला कामगार समजून आत जाऊ दिले. मुलीच्या गळ्यावर आणि पोटावर खोल जखमा झाल्या असून, तिचा उजवा हात जवळजवळ तुटला आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारी दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. दोघींचीही एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्लेखोराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. घटनेपूर्वी त्या व्यक्तीची आणि मुलीची ओळख होती का, याचा तपास अद्याप पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा बहुआयामी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे शाळेत प्रचंड घबराट पसरली, घटना घडत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिथून पळ काढला. तो माणूस पळून गेल्यावर शिक्षकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली आणि रुग्णवाहिका बोलावली.
हल्ला पाहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना भोवळ
दोन्ही मुलींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला प्रत्यक्ष पाहणारे अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले किंवा त्यांना रडू कोसळलं. यांत्रिक करवत घेऊन आलेली व्यक्ती शाळेच्या आवारात कशी शिरली आणि कोणाच्याही अडवणुकीशिवाय वर्गापर्यंत कशी पोहोचली, असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
गृहमंत्र्यांनी व्यक्त केला संताप
गृहमंत्री व्ही. अनिता या पोलीस तपासावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे, “शाळेत वर्गाच्या आत दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे मी प्रचंड हादरलो असून संतापलो आहे. शाळेच्या आत आपल्या लहान मुलींना लक्ष्य करणाऱ्या हल्लेखोरांना आपल्या समाजात स्थान नाही. मी स्वतः तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि वैद्यकीय पथकाला तिला सर्वोच्च प्राधान्याने उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. या कृत्याला जबाबदार असलेल्या नराधमाला शोधून त्याला लवकरात लवकर कठोर कायदेशीर शिक्षा देण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.”
