आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबईत राहणाऱ्या २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळे आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिच्या प्रियकराच्या गावातील घराबाहेर तिचा मृतदेव ठेवला. या मृतदेहाबरोबर प्रियकराने लग्न करावे, मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे, अशी अजब मागणी कुटुंबीयांनी केली. या मागणीचे कारण आता समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
अड्डागाल्ला कीर्ती (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची गुंटूर जिल्ह्यातील कोंद्रुपडू गावची रहिवासी होती. कीर्तीची ओळख साई सुमंत नावाच्या तरुणाशी सोशल मीडियाद्वारे झाली होती आणि गेल्या आठ वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. कीर्ती मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. मात्र, साई सुमंतने लग्नास नकार दिल्याने कीर्तीने १४ जुलै रोजी मुंबईतील आपल्या पीजी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रियकराच्या गावी अंत्यसंस्कार
कीर्तीच्या कुटुंबियांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी कीर्तीने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, तिचे अंत्यसंस्कार साई सुमंतच्या गावी म्हणजे प्रकाशम जिल्ह्यातील पोंडुरू येथेच व्हावेत अशी तिची इच्छा होती. आपली मुलगी गेल्यामुळे दुःखी असलेल्या पालकांनी तिचा मृतदेह मुंबईहून थेट पोंडुरू येथे नेला.
मृतदेह घेऊन पोंडुरूकडे धाव
पोलिसांनी सांगितले की, कीर्तीचे आई-वडील आणि नातेवाईक गुरुवारी तिचा मृतदेह घेऊन मुंबईहून पोंडुरूला पोहोचले आणि साईने मृतदेहाच्या गळ्यात ‘मंगळसूत्र’ घालावे आणि त्यानंतरच आम्ही अंत्यविधी करू अशी मागणी केली.
या घटने वेळी साई सुमंत आपल्या घरी नव्हता. तो कतारमध्ये हार्डवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. साई तिथे नसल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये गोंधळ वाढला. साईने मृतदेहाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे या मागणीसाठी कीर्तीच्या कुटुंबियांनी साई सुमंतच्या घराजवळ धरणे आंदोलन सुरू केले. साईच्या कुटुंबीयांनी शेवटी कीर्तीचे अंत्यसंस्कार पोंडुरूमध्ये करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी तिचे अंत्यसंस्कार पूर्ण केले, अशी माहिती टंगुटुरूचे पोलीस उपनिरीक्षक (SI) फणी भूषण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
कीर्तीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
