कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या कॅबिनेटने बुधवारी शपथ घेतली. काँग्रेसचे १५ आणि जेडीएसच्या १० आमदारांसह राज्याला एकूण २५ मंत्री मिळाले आहेत. यादरम्यान काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता समोर आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे.

मागील सिद्धरामय्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका निभावलेल्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. यामुळे या नेत्यांचे नाराज समर्थक रस्त्यावर उतरले असून पक्षातही मोठा तणाव निर्माण झाला आहे. एच के पाटील, रामलिंग रेड्डी, रोशन बेग, एम बी पाटील आणि तन्वीर सेठ यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, अखेरच्या यादीत या सर्वांना झटका देण्यात आला.

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचे समर्थन करणाऱ्या एम बी पाटील यांनी तर पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी कृष्ण बैरगौडा आणि विनय कुलकर्णी यांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे एच के पाटील यांच्या समर्थकांनीही पद सोडण्याची धमकी दिली आहे. तर सेठ यांच्या एका समर्थकाने तर भर रस्त्यात स्वत:वर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

जेडीएसमध्येही सध्या तणावाचे वातावरण दिसत आहे. एम सी मनुगुळींचे समर्थक माजी पंतप्रधान आणि पक्ष प्रमुख एच डी देवेगौडा यांच्या निवासस्थानी गेले होते. देवेगौडा यांनी मनुगुळींचे नाव यादीत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे समर्थक निघून गेले. जेडीएसने शपथविधीपूर्वी ३ पदे भरली नव्हती. ती नंतर भरली जाणार होती. पण ऐनवेळी दोन नावांचा समावेश केल्यामुळे आता त्यांच्याकडे एकच मंत्रिपद शिल्लक राहिले आहे. तर काँग्रेसकडे ६ पदे अजून शिल्लक आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये मंत्रिपदाचे ७ नवे चेहरे आहेत. तर जेडीएसमध्ये ६ आमदार पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत.