पक्षाने लोकसभेचे तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या उत्तर प्रदेशातील एका भाजपा खासदाराने एका वेगळ्याच अंदाजात आपला राजीनामा पक्षाच्या हाय कमांडकडे पाठवला आहे.


माध्यमातील वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्याचे भाजपा खासदार अंशुल वर्मा यांचे खासदारकीचे तिकीट पक्षाने कापल्याने ते नाराज झाले आहेत, त्यामुळे त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यासाठी ते बुधवारी सकाळी थेट लखनऊ येथील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात पोहोचले आणि तिथल्या चौकीदाराकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. तसेच समाजवादी पार्टीमध्ये त्यांनी प्रवेशही केला.

भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अंशुल म्हणाले, माझ्या मतदारसंघात मी विकास केला आहे, यापुढेची विकासालाच माझे प्राधान्य राहिल. मी यापूर्वी अंशुल होतो, अंशुल आहे आणि अंशुलच राहणार स्वतःला चौकीदार म्हणवून घेणार नाही.

राजीनामा देण्याचे कारण सांगताना अंशुल म्हणाले, जर विकास हाच तिकीट देण्यासाठी निकष होता. तर मतदारसंघात २४ हजार कोटी रुपयांची कामे करीत शेवटच्या पायरीवर असलेल्या विकासाला चौथ्या पायरीवर आणल्याची शिक्षा मला मिळाली आहे. लोकसभेतही माझी हजेरी ९५ टक्के होती, मात्र तरीही माझ्याकडून काय चूक झाली मला कळू शकलेले नाही.