Anil Agarwal ₹15,000 crore donation: संपत्तीचा ७५ टक्के वाटा समाजाला दान करण्याची घोषणा केल्यानंतर, वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली आहे. मुलाचे निधन झाल्यानंतर गेल्या आठवड्यात अगरवाल यांनी इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने आयोजित जागतिक परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोदींसोबत चर्चा करुन शिक्षण क्षेत्रात १० ते १५ हजार कोटी रुपये देण्याची मनीषा व्यक्त केली. मोदींनी अगरवालांच्या भावनेचे कौतुक केले आहे.

पीएम राऊंडटेबल ग्लोबल एनर्जी लीडर्स

अनिल अगरवाल यांनी इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने आयोजित पंतप्रधान जागतिक ऊर्जा नेत्यांची परिषद’ मध्ये हजेरी लावली. मुलाचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृतपणे एखाद्या बैठकीला उपस्थित राहिल्याचे अगरवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून सांगितले. मुलाच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना मोदींनी आमचे सांत्वन करुन धीर दिला. “मी आणि माझ्या पत्नीने खंबीर राहून देशासाठी काम सुरू ठेवावे”, असा सल्ला दिल्याने दिलासा मिळाल्याचे अगरवाल सांगतात.

७५ टक्के संपत्तीचे दान

अनिल अगरवाल यांनी यापूर्वीच एकूण संपत्तीपैकी ७५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींना सांगितले. यापुढे विश्वस्त म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी मोदींना स्पष्ट केले. दिवंगत मुलाच्या इच्छेनुसार शिक्षण किंवा आरोग्यसेवा किंवा समाजाला फायदा होईल अशा इतर कोणत्याही क्षेत्रात मोठं काम करण्याची इच्छा अगरवाल यांनी पंतप्रधान मोदींना बोलून दाखवली.

आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी १५,००० कोटी

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात १०,००० ते १५,००० कोटी रुपये गुंतवू इच्छितो, अशी भावना व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक केल्याचे अगरवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अगरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. “देशाला जमिनीवरील परिस्थितीची जाणीव असणारे आणि भारतीयांबद्दल अपार सहानुभूती असणारे पंतप्रधान लाभले आहेत”, अशा शब्दात अगरवाल यांचे कौतुक केले.

मुलाचे अकाली निधन

अनिल अगरवाल यांच्या अग्निवेश (४९) मुलाचे ०७ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. अमेरिकेत झालेल्या अपघातानंतर त्याच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. पण, हदृयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. “देशात चांगल्या सुधारणा व्हाव्यात आणि त्यासाठी काम करण्याची त्याची तीव्र इच्छा होती”, अशा भावना अनिल अगरवाल यांनी मुलाच्या मृत्यूनंतर व्यक्त केल्या होत्या.