प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ‘रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप’च्या संबंधित १ हजार २१ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
‘रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड’ (RHFL) आणि ‘रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड’ (RCFL) यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने १,०२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत केली आहे.
ईडीने आज (११ जुलै) केलेल्या कारवाईनंतर ‘रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप’च्या विरुद्ध ईडीने जप्त केलेल्या एकूण मालमत्तेचं मूल्य २०,३६७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. याआधीही अशाच प्रकारची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. या संदर्भात ईडीने सविस्तर निवेदन सादर केलं आहे.
ईडीने निवेदनात काय माहिती दिली?
दरम्यान, या कारवाईबाबत ईडीकडून एक्सवर (ट्विटर) एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनानुसार, ईडीने आरएचएफएल आणि आरसीएफएल प्रकरणात १,०२१ कोटी रुपयांची अतिरिक्त मालमत्ता जप्त केली आहे. यामुळे रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचं एकूण मूल्य आता २०,३६७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
ED attaches fresh properties worth Rs.1,021 Crore in the RHFL/RCFL case taking total attachments in Reliance Anil Ambani Group cases to Rs.20,367 Crore. SIT constituted by ED as per direction of Hon’ble Supreme Court is investigating several cases against Reliance Anil Ambani… pic.twitter.com/cSR0e0VpXQ
— ED (@dir_ed) July 11, 2026
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ईडीद्वारे स्थापन करण्यात आलेलं विशेष तपास पथक हे रिलायन्स अनिल अंबानी समूहाविरुद्ध पीएमएलए आणि एफईएमए अंतर्गत अनेक प्रकरणांचा तपास करत आहे. आतापर्यंत ईडीने ८० पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच पीएमएलए अंतर्गत ४ आणि एफईएमए अंतर्गत १ खटला दाखल करण्यात आलेला आहे. या याव्यतिरिक्त समूहातील ८ वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
आतापर्यंत ८० पेक्षा जास्त ठिकाणी छापे
ईडीकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप’च्या विरुद्ध सध्या पीएमएलए अंतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणांच्या तपासादरम्यान ईडीने आतापर्यंत ८० पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, डिजिटल नोंदी आणि महत्त्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या बरोबरच या संपूर्ण प्रकरणात ईडीकडून आतापर्यंत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि निकटवर्तीयांना अटक करण्यात आलेली आहे.
