Rafale Deal: अनिल अंबानींना ११२० कोटींची करमाफी, फ्रेंच वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ

ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात ही माहिती समोर आली आहे

अनिल अंबानी

राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १४३.७ मिलियन युरो म्हणजेच सुमारे ११२० कोटींची करमाफी दिली असा खळबळजनक दावा फ्रेंच वृत्तपत्र ले माँडने केला आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. आपल्याला ठाऊकच आहे की राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्य घालून काही फेरबदल केले आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असाही आरोप करण्यात आला आहे. त्याच दरम्यान हे वृत्त आले आहे.

२०१५ या वर्षत फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत राफेल या लढाऊ विमान खरेदीसाठी करार सुरु होता. नेमक्या याच कालावधीत अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला ११२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचा दावा ले माँड या वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळात विरोधकांच्या हाती आणखी एक कोलीत आलं आहे असंच म्हणता येईल

राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली असा आरोप आता ले माँडने दिलेल्या करमाफीच्या आरोपानंतर काँग्रेसने केला आहे. राफेल करार झाल्यापासूनच राहुल गांधींसह सगळ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राफेल करारात घोटाळा झाला आहे असा आरोप केला. तसेच देशातील जनतेचे पैसे मोदींनी लुटून अनिल अंबानींना दिले असेही राहुल गांधींनी वारंवार म्हटले आहे. आता अनिल अंबानी यांच्या फ्रान्स येथील कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त फ्रान्स मीडियाने दिले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नाहीत तर चोर आहेत अशीही घोषणा काँग्रेसने केली आहे. आता फ्रान्स मीडियाच्या दाव्याने विरोधकांना आणखी एक मुद्दा मिळाला आहे त्यावरूनही आरोप प्रत्यारोप होणार यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anil ambani group given huge tax break in france at time of nda rafale negotiations claims french newspaper