पीटीआय, नवी दिल्ली
उद्योगपती अनिल अंबानी आणि ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड’ यांची बँक खाती फसवी म्हणून घोषित करण्याच्या बँकांच्या प्रक्रियेला परवानगी देणाचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला. तसेच संबंधित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या.

उच्च न्यायालयाच्या २३ फेब्रुवारीच्या आदेशाला आव्हान देणार्‍या अंबानींच्या तीन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने अंबानींना त्यांची खाती फसवी म्हणून घोषित करण्यासाठी बँकांनी बजावलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशींविरुद्ध उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठासमोर दाद मागण्याची परवानगी दिली आहे. बँकांनी बजावलेल्या या नोटिशींविरुद्ध अंबानींनी केलेल्या याचिकेवर एकल खंडपीठाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.