आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लिंगापालेम गावात ३०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राणी मित्र संघटनांनी लिंगापालेम गाव पंचायतीला जबाबदार धरलं आहे. कुत्र्यांना दफन करत असताना ही घटना उघड झाली. फाइट फॉर अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्टिविस्ट चल्लापल्ली श्रीलता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

फाइट फॉर अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्टिविस्ट चल्लापल्ली श्रीलता यांनी दिलेल्या फियार्दीनंतर लिंगपालेम पंचायत सचिव आणि सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणी क्रूरता निवारण कायदा १९६० अन्वये कलम ११ (एल) आणि भारतीय दंड संहिता कलम ४२९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लिंगपालेम पंचायत सचिव सुगनराज यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आम्ही धर्मजीगुडेम पोलीस स्टेशनमद्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतं असं सांगितलं आहे. मात्र फॉइट फॉर अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्टिविस्ट चल्लापल्ली श्रीलता यांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.