आम आदमी पक्षाचा महाराष्ट्रातील चेहरा आणि पक्षाच्या तिकीटावर नागपूरमधून निवडणूक लढविणाऱया अंजली दमानिया यांनी आपला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वीच शाजिया इल्मी यांनीसुद्धा आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता अंजली दमानिया यांनीही आपला सोडचिठ्ठी दिली आहे.
दमानिया यांनी आपल्या सहकाऱयांना पाठविलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, अत्यंत जड अंतःकरणाने मी आम आदमी पक्षासोबतचे नाते तोडत आहे. माझ्या मोठ्या भावा सारखे असलेले अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. माझ्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णयाचा कोणताही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करू नये, अशी माझी विनंती आहे. मी कधीही मूल्यांशी तडजोड केली नाही आणि करणार नाही. याहून जास्त मला काही सांगायचे नाही. पक्षाबद्दल मला नितांत आदर आहे आणि यापुढेही राहील.
दमानिया यांनी आपमध्ये असताना नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत त्या गडकरी यांच्याविरुद्धच नागपूरमधून उभ्या राहिल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.