सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी अंकित सिरसा याच्यासह लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या दोघांना दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली आहे. सचिन भिवानी आणि प्रियाव्रत फॉजी असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

सिद्धु मुसेवालावर गोळी झाडणाऱ्यापैकी अंकित सिरसा हा एक होता. तसेच राजस्थानमधील हत्येच्या दोन गुन्ह्यातही पोलीस त्याचा शोध घेत होते. अंकितने सिद्धुवर गोळी झाडली, तेंव्हा प्रियाव्रत फॉजी हा देखील त्याच्यासोबत गाडीत होता.

२९ मे रोजी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मुसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाले होते.

सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेले पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू याच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यामध्ये दोन गाड्या मुसेवाला यांच्या कारचा पाठलाग करताना दिसत होत्या. तसेच हत्येच्या एक दिवस आधीच सिद्धूची सुरक्षा देखील पंजाब सरकारने काढून घेतली होती. यावरुनही पंजाब सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात झाली होती.