अंकिता भंडारी हत्या प्रकरणाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तीन वर्षांनंतर आता उत्तराखंडचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत सापडली आहे. या दरम्यान अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणातील पीडित मुलीच्या आई-वडिलांनी न्यायाच्या मागणीसाठी आणि या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांच्यावरही आता गंभीर आरोप करण्यात येत आहेत. यातच दुष्यंत गौतम यांची सिक्कीमचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला अंकिता भंडारीच्या पालकांनी विरोध केला असून याविरोधात इंडिया गेटवर आंदोलन सुरू केलं आहे.

अंकिता भंडारीच्या पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांनी भेट देत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी संध्याकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी इंडिया गेटवर जाऊन अंकिता भंडारीच्या पालकांशी चर्चा केली. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये अंकिता भंडारीच्या वडिलांनी राष्ट्रपतींना आवाहन केलं आहे की, अंकिता भंडारी हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

१९ वर्षीय अंकिता भंडारी ऋषिकेशमधील एका रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. कामावर रुजू होऊन अवघे २० दिवस झाले असताना १८ सप्टेंबर २०२२ रोजी रिसॉर्टचा मॅनेजर पुलकित आर्य याने तिची हत्या केली होती. पुलकित हा माजी भाजपा नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. अंकिता बेपत्ता झाल्यानंतर सहा दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) असं आढळलं की, अंकितावर ‘स्पेशल सर्व्हिस’ (लैंगिक सेवा) देण्यासाठी दबाव टाकला जात होता. तिने याला विरोध केल्यामुळेच तिची हत्या करण्यात आली.

पुलकित आर्यला हत्या, लैंगिक छळ, पुराव्यांची विल्हेवाट लावणं अशा विविध कलमान्वये दोषी ठरवण्यात आलं. अंकिताच्या हत्येच्या दिवशी रिसॉर्टमध्ये कोणीतरी ‘व्हीआयपी’ हजर असल्याचा दावा सुरुवातीपासूनच केला जात होता. परंतु एसआयटीने सांगितलं की त्यांना या प्रकरणात कोणत्याही प्रभावशाली नेत्याचा सहभाग आढळला नाही. ‘व्हीआयपी अँगल’ची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. परंतु मार्च २०२५ मध्ये न्यायालयाने ती निकाली काढली. मे २०२५ मध्ये कोटद्वार न्यायालयाने पुलकित आर्य, अंकित गुप्ता आणि सौरभ भास्कर या तिघांना अंकिता हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, अंकिता भंडारी हत्या प्रकरणाला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरवून सात महिने झाले आहेत. मात्र, आता एका वरिष्ठ भाजपा नेत्यावर आरोप झाल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये आंदोलनांची लाट उसळली.