Anmol Bishnoi Threats From Pakistani Gangster: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई विविध प्रकरणांमधील आरोपांखाली एनआयएच्या ताब्यात आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोईने आपल्या जीवाला पाकिस्तानी गँगस्टर शहजाज भट्टीकडून धोका असल्याचे सांगत दिल्ली सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची शनिवारी, दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी एनआयए मुख्यालयात सुनावणी घेतली.
अनमोलची बाजू आणि कडक सुरक्षेमुळे होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी एनआयए कायदा २००८ च्या तरतुदींचा वापर करून एनआयए मुख्यालयातच ही सुनावणी घेतली.
अनमोलच्या याचिकेत काय आहे?
पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीकडून सोशल मीडियावर अनमोलला दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा हवाला देत, त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकील रजनी यांनी एक अर्ज सादर केला होता. या अर्जामध्ये असे म्हटले होते की, आरोपीच्या जीवाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्याला अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता आहे. न्यायालयाने एनआयएला पुरेसे सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याचे आणि बिश्नोईला बुलेटप्रूफ वाहनातून, बुलेटप्रूफ जॅकेट घालून न्यायालयात आणण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती.
अनमोलच्या वकील रजनी यांनी याचिकेत पुढे असे म्हटले आहे की, “अशा धमक्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, कारण अलिकडच्या काळात सोशल मीडियावर दिलेल्या धमक्या प्रत्यक्षात खऱ्या ठरल्या आहेत.”
“मार्च २०२५ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एक गंभीर घटना घडली होती, जिथे संबंधित गुंडाने व्हिडिओद्वारे दिलेल्या अशाच प्रकारच्या धमक्यांनंतर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरावर ग्रेनेड फेकण्यात आला होता”, असे त्यामध्ये पुढे म्हटले आहे.
याचिकेत अनमोलच्या वकील रजनी यांनी एका कथित इंस्टाग्राम पोस्टचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी गुंड लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या भावाला (अनमोल बिश्नोई) आणि मामाला वाचवण्याचे खुले आव्हान देत असल्याचे दिसत आहे.
अनमोल बिश्नोई प्रकरण
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर देशभरात ३० हून अधिक खटले आहेत. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमधील खंडणी प्रकरणांचा समावेश आहे. याचबरोबर २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या प्रकरणात आणि गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणातही त्याचा समावेश आहे.
अमेरिकेतील लुझियाना न्यायालयाने त्याचा आश्रयाचा अर्ज फेटाळल्यानंतर, अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. गेल्या बुधवारी त्याला भारतात आणण्यात आले. तेव्हा एनआयएने त्याला अटक केली होती.
