केजरीवाल यांच्यावर अण्णा नाराज

अरविंद केजरीवाल चारित्र्यवान आहेत, यात शंकाच नाही. परंतु पक्ष किंवा पार्टीला माझा विरोध असल्याने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी माझे नाव वापरू नये,

अरविंद केजरीवाल चारित्र्यवान आहेत, यात शंकाच नाही. परंतु पक्ष किंवा पार्टीला माझा विरोध असल्याने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी माझे नाव वापरू नये, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्घी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. केजरीवाल यांच्याशी संबंधित विविध गोष्टींबद्दल त्यांनी या वेळी स्पष्ट शब्दांत नाराजीही व्यक्त केली. दरम्यान काही हितसंबंधी लोक अण्णांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान केजरीवाल यांनी प्रत्येकी २५ रुपये घेऊन लाखो सिम कार्डची विक्री केली होती. कालांतराने हे सिम कार्ड बंद पडल्याने दिल्लीतील रुमलसिंग या नागरिकाने न्यायालयात धाव घेऊन हजारे यांच्यासह केजरीवाल यांना आरोपी केले आहे. यासंदर्भात विचारले असता हजारे म्हणाले, या चळवळीदरम्यान जो प्रकार झाला तो मला माहीतही नाही, त्यामुळे मला आरोपी करणे अयोग्य आहे. यासंदर्भात आपण केजरीवाल यांना पत्र पाठवून विचारणा केली होती. केजरीवाल यांना आपण हे पत्र व्यक्तिगत स्वरूपात लिहिले होते. परंतु त्यांनी ते पत्रकार परिषदेत जाहीर केले, हेही योग्य नाही.
आंदोलनातील हिशेबाचा विषय संपुष्टात आला होता. तरीही हजारे यांनी तो मुद्दा पुन्हा का उपस्थित केला असा सवाल केजरीवाल यांनी केला होता, त्यावर हजारे म्हणाले, जनतेने पैसा दिला म्हणून त्याचा वापर कसाही होऊ नये असे माझे मत होते. आंदोलनाच्या कार्यालयातील वीस कर्मचाऱ्यांपैकी काही लोकांना तीस ते पस्तीस हजार रुपये पगार देण्यात येत होता. त्याची आपणास कल्पनाही नव्हती.
केजरीवाल यांच्या नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी गोंधळ घालणाऱ्या तालुक्यातील नारायणगव्हाणच्या नचिकेत वाल्हेकर याला ओळखतही नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.

चर्चेला तयार
अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यास मी तयार आहे. मात्र त्यांच्या आसपासचे लोक आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधू देत नाहीत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. मंगळवारीपत्रकार परिषदेत शाई टाकण्याचा प्रकार भाजपने घडवून आणल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

भाजपने हात झटकले
गुरू-शिष्यामधील संघर्षांत भाजपचा काही संबंध नाही असे पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. त्या दोघांनी निधीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. हा त्यांचा विषय आहे. भाजप असे खालच्या पातळीवरचे राजकारण खेळत नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anna unhappy over kejriwal publicizing his letter

ताज्या बातम्या