लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा रशियात गौरव होणार आहे. मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं १४ सप्टेंबर रोजी अनावरण होणार आहे. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित असणार आहेत.

अण्णा भाऊंनी रशियाविषयी लिखाण केले आहे. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ लोकप्रिय आहे. याशिवाय, त्यांच्या अनेक कथा – कादंबऱ्या रशियन भाषेत भाषांतरित करण्यात आल्या आहेत. आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी रशियन जनतेच्या मनातही आदराचे स्थान मिळवले आहे. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले सीमोल्लंघन लक्षात घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने रशियात मॉस्को येथील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात उभारला जात आहे, ही अतिशय गौरवाची आणि प्रेरणादायी बाब आहे. हा आपल्या सर्वांसाठी गर्वाचा क्षण आहे. अण्णा भाऊंचे रशियात अनेक महिने वास्तव्य होते. आता मुंबई विद्यापीठ आणि रशिया सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यकम होत आहे. मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्या समारंभासाठी रशियाला जाणार आहोत.”

अण्णा भाऊंच्या तैलचित्राचे १४ सप्टेंबरला अनावरण

तसेच, दोन वर्षांपूर्वी अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले, त्याचे औचित्य साधून मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात १४ सप्टेंबरला त्यांच्या तैलचित्राचे देखील समारंभपूर्वक अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे असतील.

भारत – रशिया राजनैतिक संबंध स्थापनेलाही ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने १४ आणि १५ सप्टेंबरला याच विषयावर मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.