भारतीय जनता पार्टी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्ष सोडल्यावर अवघ्या २४ तासांत २४ तासांत एक मोठा राजकीय चमत्कार दाखवला आहे. ५ जून रोजी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर अण्णामलाई यांनी त्यांच्या नव्या राजकीय चळवळीची घोषणा केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे, अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल १३ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १४ लाख लोकांनी त्यांच्या या नव्या चळवळीत प्रवेश केला आहे.
भाजपसोबत मतभेद आणि राजीनामा
माजी आयपीएस (IPS) अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकत अखेर शुक्रवारी भाजपाला अधिकृत राजीनामा दिला. पक्षाचे नेते नितीन नबीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राजीनामा देताना अण्णामलाई म्हणाले, “गेल्या १८ महिन्यांपासून तमिळनाडूतील राजकीय रणनीती आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत माझे केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद होते. तमिळनाडूच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या राजकारणाबाबत आमचे विचार जुळत नसल्याने मी हा निर्णय घेतला आहे.”
‘वी द लीडर्स’ – सामान्य माणसाचे राजकारण
अण्णामलाई यांनी त्यांच्या या नव्या मोहिमेला “पब्लिक लाइफ आणि राजकीय प्रवासाचा पुढचा टप्पा” असे म्हटले आहे. त्यांनी तरुणांना आणि सामान्य नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या नव्या चळवळीसाठी “वी द लीडर्स” (We The Leaders) नावाने एक संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू करण्यात आले असून, त्यावर लाखो लोकांनी नोंदणी केली आहे.
“एका सामान्य माणसाने राजकारणात येणे ही मोठी गोष्ट आहे. आपल्याला ‘कायमस्वरूपी आमदार आणि खासदार’ असणारी घराणेशाहीची संस्कृती संपवायची आहे. हे राजकारण सामान्य लोकांचे असेल आणि त्यात वैचारिक स्पष्टता असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणूक लढवणार
अण्णामलाई यांनी स्पष्ट केले की, त्यांची ही नवी चळवळ तमिळनाडूमध्ये आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. भविष्यासाठी नवीन आणि तरुण नेतृत्व तयार करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
“मी ६ वर्षांपूर्वी राजकारणात आलो, कारण मला तामिळनाडूचे राजकारण बदलायचे होते. राजकारण हा केवळ श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांचा खेळ नाही, तर तो सामान्य माणसाचा हक्क आहे, हा विचार मला रुजवायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि या बदलाच्या प्रवासात माझ्यासोबत या,” असे भावनिक आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
२०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अण्णामलाई यांनी अवघ्या एका वर्षात प्रदेशाध्यक्षपदापर्यंत झेप घेतली होती. आता भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी सुरू केलेल्या या स्वतंत्र प्रवासामुळे तमिळनाडूच्या राजकारणाला एक नवी आणि अत्यंत रंजक कलाटणी मिळाली आहे.
