केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि तमिळनाडूमधील हॉटेल व्यायसायिक डी. श्रीनिवासन यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संभाषणात डी श्रीनिवासन हे निर्मला सीतारमण यांची माफी मागताना दिसून येत होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच विरोधकांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकाही केली होती. अशाप्रकारे माफी मागायला लावणे हा डी. श्रीनिवासन यांचा अपमान आहे, असं विरोधकांचं म्हणणं होतं. दरम्यान, या वादावर आता अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक डी. श्रीनिवासन प्रतिक्रिया दिली आहे. एक परिपत्रक जारी करत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

डी. श्रीनिवासन यांनी परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीतील संभाषणाचा व्हिडीओ नकळत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. ज्यामुळे पुन्हा गैरसमज आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आता सर्वांनी यावर चर्चा करणं बंद केलं पाहिजे. झालं ते विसरून आपण पुढं जायला हवं, असं डी. श्रीनिवासन यांनी परिपत्रकात म्हटलं. पुढे बोलताना, ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – No proof Lord Ram existed: “प्रभू रामाचा इतिहास खोटा, आपली दिशाभूल…”, तमिळनाडूच्या मंत्र्यांने काय म्हटले?

नेमकं प्रकरण काय?

११ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री सीतारमण यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथे उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक घेतली होती. या बैठकीत तामिळनाडू हॉटेल्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे डी. श्रीनिवासन यांनी जीएसटीच्या विसंगती तसेच ग्राहकांच्या तक्रारींबाबत अर्थमंत्र्यांसमोरच भाष्य केलं होतं. प्रत्येक वस्तूवर वेगवेगळा कर लावण्याच्या पद्धतीमुळे कॉम्प्युटरलासुद्धा मोजता येत नाही, इतका गोंधळ निर्माण झाला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती.

हेही वाचा – CP Radhakrishnan : “चुकीच्या पक्षातील चांगला माणूस”, विरोधकांनीही कौतुक केलेले सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

या भेटीनंतर डी. श्रीनिवासन यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीदरम्यानच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संभाषणात डी. श्रीनिवासन हे निर्मला सीतारमण यांची माफी मागताना दिसून येत होते. तसेच आपण कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसून बैठकीत विचारलेले प्रश्न राजकीयदृष्ट्या प्रेरित नव्हते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.