वृत्तसंस्था, नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी केंद्रीय मंत्री तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकरणात शुक्रवारी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी छापे सुरू आहेत. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात जमीन घेण्यात आल्याचे हे प्रकरण असून त्या काळात लालूप्रसाद यादव हे संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी एकूण १७ ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. ही ठिकाणे लालूप्रसाद, त्यांचे कुटुंबीय आणि मुलगी मिसा भारती यांच्याशी संबंधित आहेत. दिल्ली, पाटणा आणि गोपालगंज येथे ही शोधमोहीम सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात लालूप्रसाद यांच्यावर असा आरोप आहे की, ते रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात संबंधितांकडून भूखंड मिळविले.  लालूप्रसाद यांना याआधीच्या चारा गैरव्यवहारप्रकरणी जामीन मिळालेला आहे. चारा घोटाळय़ाच्या चार प्रकरणांत यादव यांना दोषी ठरविण्यात आले आहे आणि एका प्रकरणात खटला अद्याप सुरू आहे. दुसऱ्या एका प्रकरणात एका खासगी कंपनीला लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात पाटणा येथे भूखंड मिळविल्याचा आरोप यादव यांच्यावर आहे. या आयआरसीटीसी घोटाळय़ात त्यांच्यावर आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यात लालू यांच्या पत्नी राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी हेसुद्धा आरोपी असून २०१८ मध्ये हे आरोपपत्र दाखल झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another case corruption lalu prasad alleged acquisition land recruitment railways ysh
First published on: 21-05-2022 at 00:05 IST