उत्तर प्रदेशात शहाजहानपूर येथे एका मंत्र्याने पत्रकाराचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता पिलिभीत येथे लोकांच्या गटाने पत्रकारावर हल्ला केला आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिलिभीतचे पोलीस अधीक्षक जे.के.शाही यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील वार्ताहर हैदर याने त्याच्यावर आनंद व इतर काही जणांनी हल्ला केल्याची तक्रार दिली आहे. हैदर याने दिलेल्या बातम्या त्यांच्या विरोधात होत्या. हैदरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल आपल्याला दरोडय़ाच्या प्रकरणाचा एक फोन आला पण जेव्हा आपण घटनास्थळी गेलो तेव्हा आनंद व तीन-चार जणांच्या टोळक्याने मारहाण सुरू केली. त्यांनी रिव्हॉल्वरच्या दस्त्याने मारले. नंतर कारला बांधून १०० मीटर फरपटत नेले, पूरणूपर येथे झालेल्या या घटनेत आपण बेशुद्ध पडलो. नंतर वाटसरूंनी आपल्याला मदत करून पहारपूर पोलीस स्टेशनला आणले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पत्रकाराची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून आरोपींवर कारवाई करण्यात येईल. शहाजहानपूर येथे जगेंद्र सिंह या पत्रकाराला पोलिसांनी घरात जाऊन पेटवून दिले होते. नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशचे मंत्री राममूर्ती वर्मा व पोलीस निरीक्षक श्रीप्रकाश राय यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर वर्मा यांच्याविरोधात बातम्या दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. वर्मा हे बेकायदा खाणकाम उद्योगात गुंतलेले होते.