क्रीडा शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, विद्यार्थ्यावर आयसीयूत उपचार

मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट

विद्यार्थ्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु

गुरुग्राम येखील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमुळे पीडित विद्यार्थ्यावर नजीकच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत असल्याचं समजतंय. काही महिन्यांपूर्वी प्रद्युमन ठाकूर या ७ वर्षाच्या मुलाची रेयान इंटरनॅशनल स्कूल या शाळेत गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे गुरुग्राममधील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘मिरर नाऊ’ने या संदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे.

शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं कळतंय. या प्रकारानंतर विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचारांनंतर सध्या या मुलाच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी म्हणलं आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली असून, यामध्ये शाळेने पीडित मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात उशीर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, क्रीडा शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Another reyan internation school like incident happen in gurugram as sports teacher beat 10th class student