काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून गेल्या आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांनी ट्विटरला दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले असताना, काँग्रेसने बुधवारी दावा केला की रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती, जिची कथितपणे बलात्कार आणि हत्या झाली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते.

दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केल्यामुळे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खाते लॉक केले आहे. शिवाय, ट्विट देखील काढून टाकण्यात आले आहे. तसेच, हे आमच्या धोरणाविरूद्ध असल्याने आम्ही ते ट्विट डिलिट केले असल्याची माहिती ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली होती.