सॅन फ्रान्सिस्को : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापराची चिंता व्यक्त होत असतानाच एआय विकासाचा वेग कमी करणे आवश्यक आहे, अन्यथा या प्रणालींवरील मानवी नियंत्रण गमावण्याचा धोका आहे, असा इशारा ‘अँथ्रोपिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डारिओ अमोदेई यांनी शनिवारी दिला. एआय उद्योगाने विकासाचा वेग कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी भूमिका मांडताना स्वत:च्या कंपनीच्या सुरक्षा उपायांची पडताळणी करण्यासाठी बाह्य निरीक्षकांना कर्मचार्‍यांइतकाच थेट आणि कायमस्वरूपी प्रवेश देण्याची घोषणाही अँथ्रोपिकने केली आहे.

अमोदेई यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे एआय विकासाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन टप्प्यांची योजना मांडली. बाह्य निरीक्षकांना आपल्या प्रणालींचा कायमस्वरूपी प्रवेश देणे, हे त्यातील पहिले पाऊल अँथ्रोपिक  उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. या बाह्य निरीक्षकांना कंपनीच्या सुरक्षा उपायांचे पालन होत आहे की नाही, घटनांची नोंद, एआय मॉडेल्सचे मानवी मूल्यांशी सुसंगतता तपासता येईल.

एआयमुळे मानवी जीवनाचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो, असा विश्वास अमोदेई यांनी व्यक्त केला. पुढील पाच ते दहा वर्षांत एआयच्या मदतीने अनेक प्रमुख आजारांवर उपचार शक्य होतील, आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, तसेच लोकशाही आणि स्वातंत्र्याला नवी चालना मिळू शकते, असे त्यांनी म्हटले. मात्र, एआयच्या क्षमतेसोबत त्याचे गंभीर धोकेही आहेत. एआय प्रणालींवरील नियंत्रण गमावणे, सायबरहल्ले,  जैव-दहशतवादासाठी गैरवापर तसेच मोठ्या आर्थिक उलथापालथीचा धोका यामध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

नियंत्रण सुटल्यास काय?

एका घटनेचा संदर्भ देताना अमोदेई यांनी सांगितले की, एआय एजंट्सच्या एका समूहाने त्यांना तसे करण्यास सांगितले नसतानाही काही लक्ष्यांवर सायबरहल्ले केले होते. अशा प्रकारचा एआय एजंट्सचा समूह संपूर्ण इंटरनेटचा ताबा घेण्याइतका सक्षम होऊ शकतो. अमेरिका व इतर लोकशाहीवादी सरकारांनी हुकूमशाही सरकारांशीही समन्वय साधावा. मात्र, अशा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी करण्यातील आव्हाने गांभीर्याने घ्यायला हवीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘स्वत:चीच पिढी घडवण्याची क्षमता’ एआय मॉडेल्सच्या क्षमतेत वेगाने वाढ होत असून, एआयला पुढील पिढीतील एआय विकसित करण्याची क्षमता मिळत असल्यामुळे हा वेग आणखी वाढत आहे, असे अमोदेई यांनी म्हटले. ही प्रक्रिया अँथ्रोपिकसह संपूर्ण उद्योगात सुरू झाली आहे. हा वेग अनियंत्रित राहिल्यास एआय प्रणाली समजून घेण्याची आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची मानवाची क्षमता त्यापेक्षा मागे पडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.