इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाने उग्र रुप घेतलं आहे. आंदोलनात आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला असून, ७०० जणांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, आंदोलनात मृत्यू झालेल्या जावेद नावाच्या एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जावेदची बहिण त्याच्या कबरीवरच केस कापत निषेध व्यक्त करत असल्याचं दिसत आहे.

इराणमध्ये पोलीस कोठडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. राजधानी तेहरानसह देशाच्या अनेक भागांत अद्याप दंगली होत असून जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे.

आंदोलनाचं नेमकं कारण काय?

माशा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात पसरलं. यानंतर अत्याचाराविरोधात सगळीकडे निदर्शनं सुरू झाली. महिलांना आंदोलन करत सक्तीचे असलेले डोक्यावरचे स्कार्फ महिलांनी भिरकावून दिले आहेत.

इराणमध्ये हिंसेचा उद्रेक ; तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर देशभर संताप; नऊ ठार

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये महिला रडत असून शोक व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे, एक महिला आपले केस कापत असल्याचं दिसत आहे. ही महिला मृत व्यक्तीची बहिण असल्याचं बोललं जात आहे. केस कापल्यानंतर ती कबरीवर ठेवून देते.

इराणच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मसिह यांनी सांगितल्यानुसार, महिला केस कापून आपला संताप आणि शोक व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडलं?

माशा अमिनी २२ वर्षीय तरुणीला तेहरानच्या ‘मोरल पोलिसां’नी अटक केली होती. हिजाब व्यवस्थित घातला नसल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. कोठडीत असतानाच तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र माशाला हृदयरोग नसल्याचं तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याविरोधात इराणी जनता पेटून उठली आहे.