जम्मू : जम्मूतील हवाई दल केंद्रांवर करण्यात आलेले दहशतवादी ड्रोन हल्ले तसेच पुलवामा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी पोलीस अधिकारी, त्याची पत्नी व कन्या यांची केलेली हत्या या घटनांच्या निषेधार्थ शिवसेना डोग्रा फ्रंटने सोमवारी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला.

रविवारी स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई तळावर आदळवण्यात आले होते. पहिला स्फोट पहाटे १.४० वाजता तर दुसरा त्यानंतर सहा मिनिटांनी झाला होता.  त्यानंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात विशेष पोलीस अधिकारी, त्याची पत्नी व कन्या यांना गोळ्या घालून ठार केले होते. शिवसेना डोग्रा फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली जम्मूतील राणीपार्क या मध्यवर्ती भागात पाकिस्तानचा ध्वज जाळत दहशतवादी हल्ल्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात केली. गुप्ता यांनी सांगितले की, विशेष पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या तसेच जम्मूतील हवाई तळावर करण्यात आलेला हल्ला याच्या विरोधात आम्ही निदर्शने केली. पाकिस्तानच्या अशा हल्ल्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्याबाबत त्यांनी सांगितले की, पाकिस्तानशी संवाद पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्यांचे आता तरी डोळे उघडावेत. पाकिस्तान त्यांचे मार्ग बदलणार नाही. सीमेवर तिरंगा फडकावणे हेच त्यावरचे उत्तर आहे. पाकिस्तान व त्यांच्या जम्मू-काश्मीरमधील समर्थकांविरोधात युद्ध छेडण्याची गरज आहे. ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तानने भारतापुढे नवे आव्हान निर्माण केले आहे. ते आता ड्रोनमधून शस्त्रे व अमली पदार्थ टाकत आहेत. भारताने ड्रोन विरोधी तंत्रज्ञान वापरण्याची गरज असून जे लोक पाकिस्तानशी चर्चेची भाषा करतात त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे, असे गुप्ता म्हणाले.