scorecardresearch

Premium

तेलंगणविरोधात आता राजीनामासत्र

संयुक्त पुरोगामी आघाडीची समन्वय समिती व काँग्रेस कार्यकारी समिती यांनी तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीस हिरवा कंदील दिल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याकरिता आंध्र प्रदेश मंत्रिमंडळातील तेलंगणाविरोधी चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

तेलंगणविरोधात आता राजीनामासत्र

संयुक्त पुरोगामी आघाडीची समन्वय समिती व काँग्रेस कार्यकारी समिती यांनी तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीस हिरवा कंदील दिल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याकरिता आंध्र प्रदेश मंत्रिमंडळातील तेलंगणाविरोधी चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राज्याच्या विभाजनाविरोधात या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांच्याकडे दिले आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या सहा आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. दरम्यान, विभाजनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रायलसीमा व किनारी आंध्र प्रदेशातील जनजीवन बंदमुळे विस्कळीत झाले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या वेळी हा निर्णय आपल्यालाही आनंदाचा वाटत नाही, पण त्यातून मार्ग काढणे भाग आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण या मंत्र्यांनी संयुक्त आंध्र प्रदेशच पाहिजे असे सांगून अखेर राजीनामे दिले. रायलसीमा व किनारी आंध्र प्रदेशातील काँग्रेस समित्यांच्या अकरा नेत्यांनीही राजीनामा दिला आहे.
रायलसीमा व किनारी आंध्रातील कडप्पा, चित्तूर, विशाखापट्टणम व कृष्णा या जिल्हय़ांत शिक्षण संस्था, व्यापारी आस्थापना, आंध्र प्रदेश राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद होती. आंध्र प्रदेश विभाजनाच्या काँग्रेसच्या निर्णयाविरोधात या भागांमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. संयुक्त आंध्र समर्थकांनी निदर्शने केली तसेच निषेध सभाही घेतल्या. अनेक ठिकाणी रस्त्यावर ठिय्या देऊन बस अडवण्यात आल्या. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाने काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सेवा बंद केली. असे असले तरी सकाळपर्यंत हिंसाचाराचा कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. रायलसीमा व किनारी आंध्र प्रदेशात राज्य पोलिसांच्या मदतीला केंद्रीय निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. येथील काही भागांत ग्रामपंचायत निवडणुकांचा शेवटचा व तिसरा टप्पा सुरू आहे. काँग्रेस व यूपीए यांनी काल आंध्र प्रदेशातून तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकारी समितीने दहा जिल्हय़ांचा समावेश असलेल्या नवीन तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. देशातील हे २९वे राज्य असणार आहे. तेलंगणाच्या गळ्यातील ताईत असलेले हैदराबाद शहर ही या राज्यांची पहिली दहा वर्षे संयुक्त राजधानी असेल, तोपर्यंत नवीन राजधानी ठरवली जाईल, असा प्रस्ताव आहे.
धक्क्याने शेतकऱ्याचे निधन
कडाप्पा – आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होणार आणि तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण होणार या वृत्ताचा धक्का बसल्यामुळे येथे एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. मेहबूब बाशा असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो ४८ वर्षांचा होता. दूरचित्रवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेले आंध्र विभाजनाचे वृत्त बाशा याने ऐकले आणि त्या धक्क्याने तो एकदम कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले अशी माहिती, त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
नव्या राजधानीच्या मागण्या
हैदराबाद – पुनर्रचित आंध्र प्रदेशची नवी राजधानी रायलसीमा प्रांतातील असावी अशी मागणी या भागातील काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. आंध्रच्या निर्मितीच्या वेळी राजधानी म्हणून रायलसीमा प्रांतातील कुर्नूलचे नाव अग्रस्थानी होते, मात्र तो मान हैदराबादला मिळाला. आताही हैदराबाद ही नेमकी कोणाची राजधानी ठरेल हे निश्चित नाही.
तेलगू देसमचे केंद्राला साकडे
नव्या राजधानीसाठी केंद्र सरकारने तातडीने समितीची स्थापना करावी आणि निधीवाटपाचे प्रश्न निकाली काढावेत असे साकडे तेलगू देसम पक्षाच्या वतीने केंद्र सरकारला घालण्यात आले आहे. नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी किमान ४ ते ५ लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. नवी राजधानी ही हैदराबाद शहराच्या तोडीस तोड असावी अशी अपेक्षा तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली. नव्या राज्याच्या उभारणीसाठी आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य, पायाभूत सुविधा, याची पूर्तता केंद्राने करावी, अशी सूचना नायडू यांनी केली.

स्वतंत्र कार्बी राज्याच्या मागणीसाठी राजीनाम्याचे सत्र सुरू
आंध्र विभाजनाच्या निर्णयानंतर काँग्रेस पक्षांतही नाराजीचे वातावरण असून पेंदुर्थी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार पी. रमेश बाबू यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचे सभापती नोंदला मनोहर यांच्याकडे मंगळवारी रात्रीच आपण फॅक्सद्वारे राजीनामा पाठवून दिला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेसचे गुंटूरचे खासदार रायपती सांबशिव राव यांनी आपल्या खासदारकीचा तसेच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.राज्याचे विभाजन हे लोकभावनेच्या विरोधात आहे. तेलंगणा भागातील काँग्रेसच्या आमदारांनी या प्रश्नावर पक्षनेतृत्वाची दिशाभूल केली आहे, अशी भावना राव यांनी व्यक्त केली.

तेलंगणच्या मुद्दय़ावरून डाव्यांमध्ये फूट
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दय़ावरून डाव्या पक्षांमधील मतभेद पुढे आले आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि क्रांतीकारी समाजवादी पक्ष या दोघांनी निर्णयास विरोध केला आहे. तर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी विभाजनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, सर्वच डाव्या पक्षांनी आंध्रच्या जनतेने सौहार्दपूर्ण वातावरण कायम राखावे, असे आवाहन केले आहे. तेलंगणाच्या निर्णयामागे  लोकसभा निवडणुकांचे राजकारण आहे असा आरोप माकपने केला.

तेलंगणनिर्मितीचे जनता दलाकडून स्वागत
स्वतंत्र तेलंगणानिर्मितीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष शरद यादव यांनी स्वागत केले आहे. तसेच राज्य विभाजनाच्या निर्णयास विरोध असलेल्यांनी शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यापूर्वीही लहान-लहान राज्यांच्या या निर्णयाचे आम्ही समर्थन केले होते, आजही आम्ही त्यावर ठाम आहोत, असे यादव यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anti telangana activists to lay siege at houses of ap ministers

First published on: 01-08-2013 at 02:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×