मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एका पत्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतःला पत्रकार सांगणारा अनुज भगत नावाचा व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतर बसमध्ये महिला पोलिसाला वारंवार आपल्याला सोडण्याची विनंती करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलीस कर्मचारी बसचा दरवाजा बंद ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. बाहेर असलेले आंदोलक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना बसमधील अनुज तिला म्हणतो, “दीदी, छोट्या भावासाठी एवढं करू शकत नाही का?”
‘दिल्ली महिला पोलीसांना सलाम’
महिला पोलिसाला सोडण्याची विनंती करतानाच अनुज तिचे कौतुकही करत होता, तसेच “दिल्ली पोलिसांमध्ये ज्या महिला आहेत, त्यांना सलाम आहे,” असेही तो म्हणाला. बाहेर आंदोलकांकडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू असतानाही संबंधित महिला पोलीस कर्मचारी शांतपणे आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्याने सांगितले. कोणतीही शिवीगाळ न करता परिस्थिती हाताळल्याबद्दलही त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले.
काही वेळाने आणखी एक महिला पोलीस कर्मचारी दरवाजा बंद ठेवण्यासाठी मदतीला आली. त्यावेळी अनुज म्हणाला की, “मी या पोलिसांना कसं हटवू? या माझ्या बहिणी आहेत.” त्यानंतर पुन्हा त्याने आपली ओळख पत्रकार म्हणून सांगत स्वतःला सोडण्याची विनंती केली.
‘दीदी, आम्ही पत्रकार आहोत’
व्हिडीओमध्ये अनुज म्हणाला, “दीदी, आम्ही पत्रकार आहोत, आम्ही काही करत नाही आहोत,” असे म्हणत त्याने पोलिसांकडे त्याला सोडण्याची विनंती केली. दरम्यान, बसच्या बाहेर काही आंदोलक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. या संपूर्ण प्रसंगादरम्यान अनुजचा विनोदी आणि हलकाफुलका संवाद कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे.
याआधीही बसमध्ये जाण्याची केली होती विनंती
अनुजने यापूर्वी शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये त्याने पोलिसांना आपल्याला बसमध्ये प्रवेश देण्याची विनंती केल्याचे दिसले. “प्लीज मला बसमध्ये जाऊ द्या, माझे मित्र आत आहेत,” असे त्याने पोलिसांना सांगून त्याने बसमध्ये प्रवेश केला.
‘सीईसी’ आणि ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर देशभर आंदोलन
‘सीईसी’ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. २ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांमध्ये विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक आणि विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला आहे.
४ ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलकांनी जंतरमंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अशोक रोडवर बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला. या कारवाईदरम्यान सुमारे पाचशे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना सुमारे १० ते १५ बसमधून मध्य दिल्लीतील विविध ठिकाणांहून नेण्यात आले.
