भारताच्या राजनैतिक अधिकारी अनुपमा सिंह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पाकिस्तानवर जोरदार टिका केली. यावेळी त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा समाचार घेतला. यासाठीच पाकिस्तानला त्यांनी ‘जिवंत अनागोंदीचे उदाहरण’ या विशेषणाने संबोधले. जिनिव्हा येथे भरलेल्या ६२व्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारताच्या ‘प्रत्युत्तर देण्याच्या अधिकारा’चा वापर करून त्यांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या आरोपांना ठामपणे फेटाळून लावले आणि भारताची बाजू प्रभावीपणे मांडली.

पाकिस्तानचा अनागोंदी कारभार

पाकिस्तान हा देश तिथल्या सरकारपेक्षा छद्मी दहशतवादी गटच जास्त सांभाळत आहे, असे त्या म्हणाल्या. पाकिस्तानचा इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. पाकिस्तानला नेहमीच आपल्या दहशतवादी गटांवरच जास्त अवलंबून राहावे लागले आहे. जगाकडून सहानूभुती मिळवण्याचे ढोंग पाकिस्तानने करू नये, असे खडे बोल सिंह यांनी सुनावले.

त्या पुढे म्हणाल्या, “हा तो देश आहे, जिथे संरक्षण मंत्रीच दहशतवाद्यांचे पालनपोषण करतात. त्यांना प्रशिक्षण देतात आणि हिंसाचारासाठी तयारही करतात. तरीही पाकिस्तान स्वतःला दहशतवादापासून पीडित असल्याचे कसे काय म्हणू शकतो? याचेच खरे आश्चर्य वाटते. पाकिस्तान हे जिवंत अनागोंदीचे उदाहरणंच म्हणावे लागेल. त्यांनी जगासाठी रचलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकले आहेत.”

पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा

पाकव्याप्त काश्मिरमधील अशांततेला उद्देशून सिंग यांनी पाकिस्तान कसे मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, याचा दाखला दिला. पाकिस्तान सराकरने तेथील हिंसाचाराविरोधी काहीच काम केले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विशेषकरून रावळकोट येथील आंदोलकांची ज्या निर्घृण पद्धतीने पिळवणूक करण्यात आली त्याचा उल्लेख सिंह यांनी यावेळी केला.

‘रावळकोटची शोकांतिका’ हे पाकिस्तानच्या नागरी हिंसाचाराचे जिवंत उदाहरण आहे. पाकव्याप्त काश्मिरमधील क्रूर दडपशाहीचे हे भीषण परिणाम आहेत. तिथल्या लोकांनी काय मागितले? अन्न, वीज आणि पाणी… पाकिस्तान सरकारने काय दिले? पाकिस्तान सरकारने त्यांना गोळ्या घातल्या !”

सिंधू जलकरार कालबाह्य

सिंह यांनी थेट ६६ वर्ष जून्या सिंधू जल करारावर बोट ठेवले. पहलगाम येथे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर सिंधू जल करार हा आता कालबाह्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले. “जम्मू-काश्मिरचा सर्व प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि भविष्यातही राहील. पाकिस्तानची ही नेहमीची नाटके आहेत. जगाला आता याचे नवल वाटण्याचे काहीच कारण उरलेले नाही”, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला सुनावले.

पाकिस्तानने भारतीय भूभागावरील दावे करण्याचा अट्टाहास सोडून स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.