पाकिस्तान हा दशतवादी कारवाया करणारा आणि कुरापती काढणारा देश आहे. भारताला काहीतरी पोकळ धमकी किंवा इशारे देण्याची या देशाची सवय सुटत नाही. पण भारताकडूनही पाकिस्तानला तसंच उत्तर मिळतं. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी UNGA म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून भारताला सिंधु करारावरून इशारा दिला. पण भारताने त्यांना थेट चोख प्रत्युत्तरच दिलं. एवढंच नाही तर शाहबाज शरीफ यांनी जे दावे केले ते खोडूनही काढले.

शाहबाज शरीफ काय म्हणाले?

शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात सिंधु जल कराराचा उल्लेख करत आधी रडगाणं गायलं की भारताने आमचं पाणी अडवलं आहे. त्यानंतर ते म्हणाले जर भारताने पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी रोखलं किंवा त्या पाण्याचा मार्ग बदलला आम्ही त्याला अॅक्ट ऑफ वॉर म्हणजेच युद्धाची कारवाई असंच समजू. एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांकडून ते कसं रोखलं गेलं याचे खोटे गोडवेही गायले. एवढंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंडभरून कौतुक केलं. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही देशांमध्ये होणारं अणुयुद्ध एका अर्थाने थांबवलं अशी फुशारकी शाहाबाज शरीफ यांनी मारली. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या या विधानानंतर भारतानेही त्यांच्या या थेट इशाऱ्याला थेट उत्तर दिलं.

भारत सरकारकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे दावे भारताकडून खोडण्यात आले. जर शाहबाज शरीफ यांना वाटत असेल की उद्ध्वस्त झालेले रन वे, जळून खाक झालेले हँगर्स हे पाकिस्तानसाठी विजयाचं प्रतीक आहे तर त्यांनी खुशाल विजयोत्सव साजरा करावा. भारतीय अधिकाऱ्यांनी याच मंचावरून शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानला हे उत्तर दिलं की ऑपरेशन सिंदूरबाबत जे दावे शाहबाज शरीफ करत आहेत त्यांनी जरा आधी हे आठवलं पाहिजे पाकिस्तानकडून युद्ध थांबवा अशी विनंती करण्यात आली होती. तुम्ही कुरापत काढलीत म्हणून आम्ही उत्तर दिलं होतं ज्यानंतर तुम्ही याचना केलीत की आता युद्ध नको. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरला स्थगिती दिली. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान सिंधु जल करारावरून शाहबाज शरीफ यांनी जे विधान केलं आहे त्यावरून आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा वाद किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. पहलागामच्या हल्ल्यानंतर सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने पाण्यासाठी रडगाणं गायलं जातं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा यावरून इशारा दिला आहे. त्याला भारत कसं उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.