समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव बऱ्याचदा पक्षाच्या भूमिकेविरोधात किंवा वेगळी वक्तव्ये करत असतात. एका मुलाखतीदरम्यान त्यांना अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबाबत अखिलेश यादव यांनी दिलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. यावर त्या म्हणाल्या, की मी फक्त माझे काम करते. यावेळी अपर्णा यांनी इतर अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले होते.

अपर्णा यांना विचारण्यात आले होते की तुम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी पैसे दिले आहेत का? याला उत्तर देताना त्यांनी सांगितले होते, ठहो मी पैसे दिले आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांनाही देणगी देण्यास सांगितले आहे. राम मंदिर हे राष्ट्र मंदिर म्हणून उदयास येत आहे. हे प्रत्येकाचे मंदिर आहे आणि प्रत्येकाने यात योगदान दिले पाहिजे.” राम मंदिराच्या बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या देणगीच्या रकमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुमच्या कुटुंबाचे नेते अखिलेश यादव यांनीही त्या लोकांना ‘चंदाजीवी’ म्हटले आहे? या प्रश्नावर अपर्णा यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि म्हणाल्या, “मला जे योग्य वाटते ते मी करते. राम नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिले आहेत.”

अपर्णा यांनी भगवान राम यांना भारताचे चरित्र म्हणून वर्णन केले होते. “राम मंदिराच्या उभारणीसाठी किती तरी पिढ्या बळी गेल्या. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणात सामील होऊन राम मंदिराच्या बांधकामासाठी समर्पण राशी दिली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या होत्या. स्वतःला सनातनी म्हणत अपर्णा म्हणाल्या की, “मी जे काही केले आहे, ते मी माझ्या मर्जीने केले आहे. यावर टिप्पणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी उत्तर देणार नाही. आजही आमच्या कुटुंबातील मुले रामासारखी व्हावीत असे आम्हाला वाटते. जे लोक माझ्याबद्दल उलटसुलट बोलत आहेत, त्यांनी त्यांनी थोडेसे राम वाचले तर भारतात राम राज्य स्थापन होईल.”