पीटीआय, कोलंबो : गेले दोन महिने आपल्या समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या पेट्रोलच्या जहाजाला किंमत चुकती करण्यासाठी आपल्याजवळ विदेशी चलन नसल्याचे संकटग्रस्त श्रीलंकेने बुधवारी उघड केले. ‘कृपया इंधनासाठी रांगेत उभे राहू नका’, असे आवाहनही नागरिकांना केले.

याचवेळी, देशाला डिझेलचा पुरेसा साठा मिळाला असल्याचेही सरकारने सांगितले.पेट्रोल घेऊन आलेले एक जहाज २८ मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले. देशाला पेट्रोलच्या उपलब्धतेच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याच्या वृत्तावर त्यांनी शिक्कामोर्तब केले, असे वृत्त ‘न्यूजफर्स्ट.एलके’ या ऑनलाइन पोर्टलने दिले. ‘या जहाजाला पेट्रोलच्या किमतीपोटी देण्यासाठी आमच्याजवळ अमेरिकी डॉलर्स नाहीत’, असे विजेसेकरा म्हणाले.