अफगाणिस्तानबाबत भारत-अमेरिकेचे संयुक्त निवेदन 

तालिबानने त्यांच्या वचनांचे पालन करून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी, तेथे दहशतवाद्यांना आश्रय व प्रशिक्षण देऊ नये, असे आवाहन भारत व अमेरिका यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याची गरज आहे. तालिबानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातील ठरावानुसार त्यांच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी. दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये. त्यांना अर्थपुरवठा करू नये अफगाणिस्तानातील दहशतवादाचा मुकाबला करणे ही महत्त्वाची बाब आहे. भारत सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष असताना अफगाणिस्तानबाबत एक ठराव करण्यात आला असून त्यात अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे म्हटले आहे.

अध्यक्ष बायडेन व पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानात महिला, मुले, अल्पसंख्याक यांच्या हक्कांचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानला मानवतावादी तत्त्वावर मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जी २० देशांच्या बैठकीत केले होते.

या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या अधिवेशनानिमित्त पार पडली होती.

शिक्षा दिलेल्या आरोपींचे मृतदेह मुख्य चौकांमध्ये

काबूल : पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मुख्य चौकात तालिबानने एका क्रेनवर जाहीररीत्या मृतदेह टांगल्याचे एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने शनिवारी सांगितले.

तालिबानी दहशतवाद्यांनी चार मृतदेह या चौकात आणले आणि त्यापैकी तीन मृतदेह त्यांनी इतर चौकांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी हलवले, असे या चौकात औषधाचे दुकान चालवणाऱ्या वझीर अहमद सिद्दिकी याने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितले. हे चौघे अपहरणाचा गुन्हा करत असताना पकडले गेले व पोलिसांनी त्यांना ठार मारले असे तालिबानने या चौकात जाहीर केल्याचे सिद्दिकी म्हणाला.

कट्टरतावादी चळवळ पुन्हा एकदा फाशी देणे आणि हात तोडणे यांसारख्या शिक्षा अमलात आणेल, मात्र कदाचित त्या सार्वजनिक नसतील असे तालिबानच्या संस्थापकांपैकी एक असलेला आणि यापूर्वी तालिबानची अफगाणिस्तानवर सत्ता असताना इस्लामी कायद्याचा कठोर अर्थ लावून त्याची अंमलबजावणी करण्यातील मुख्य असलेला मुल्ला नुरुद्दीन तुराबी याने वृत्तसंस्थेला सांगितले.

क्वाड गट जगाच्या भल्यासाठी- मोदी

वॉशिंग्टन : क्वाड देशांचा गट  हा जगाच्या भल्यासाठीच असून हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड देशांच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया, जपान या देशांचे पंतप्रधान तसेच अमेरिकेचे अध्यक्ष  जो बायडेन यांच्या उपस्थितीत सांगितले.  बायडेन यांच्या निमंत्रणानुसार क्वाड देशांच्या बैठकीस हे नेते उपस्थित होते.