Apple Employee Quits Job to Drive Auto: आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आणि भरभक्कम वेतन घेणारी तरुण मुलं हल्ली वेगळी वाट धरताना दिसून येतात. भारताचे आयटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये अनेक तरुणांनी करिअरची वेगळी वाट धरल्याचे दिसते. आता राकेश नावाच्या एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने ॲपल सारख्या दिग्गज आयटी कंपनीमधून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक कंपन्यात भरघोस वेतन असलेल्या नोकऱ्या केल्या. आलिशान अशा जीवनशैलीचा आनंद घेतला. इतरांसाठी स्वप्नवत असलेले आयुष्य जगत असूनही राकेशच्या आत एक पोकळी आणि एकाकीपण जाणवत होते. यातून बाहेर पडण्याचा त्याने वेगळाच मार्ग निवडला.

इंडिया टुडे संकेतस्थळाने राकेशच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. राकेशने म्हटले, “माझ्या आयुष्यात सुरुवातीला सगळे चांगले चालले होते. पण कॉर्पोरेटमध्ये काम करताना हळूहळू लक्षात आले की, तिथे फक्त लोकांचा वापर केला जातो. इतरांना खूश करण्याच्या नादात मी स्वतःला विसरून गेलो होतो. इतरांना खूश करणारा माणूस अशी माझी ओळख झाली. माझ्याकडे सर्व सोयीसुविधा असूनही मनात आनंद नव्हता.”

राकेशला कॉर्पोरेट क्षेत्रातील बनवेगिरीचा कंटाळा आला होताच. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खळबळ माजलेली होती. वडिलांबरोबरचे संबंध आणि वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे राकेश मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. कालांतराने समस्या वाढल्यानंतर त्याला निमहंस आणि व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले.

एकाकीपणातील आठवणी सांगताना राकेश म्हणाला, मी तासनतास एकाच जागी बसून राहायचो. माझ्या मनात तासनतास अनेक विचार सुरू राहायचे. मी मला घरात कोंडून घेतले होते.

पुन्हा उत्साह कसा मिळवला?

या नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राकेशने स्वतःच प्रयत्न करायचे ठरवले. फक्त औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा राकेशने मानसशास्त्राचा अभ्यास करून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डार्क ट्रायड या संज्ञेचा अभ्यास करून राकेशनी स्वतःची मनोविकृती समजून घेतली.

मानसिक आरोग्याची मशागत करत असताना राकेशने शारीरिक आरोग्यालाही शिस्त लावली. त्याने अधूनमधून उपवास करत १५ किलो वजन कमी केले. मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेऊन त्याने स्वतःचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला. एवढेच नाही तर त्याने राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवले.

कामातून मिळवला आनंद

राकेशने यानंतर अनेक प्रकारची छोटी-मोठी कामे केली. जेवणाची डिलिव्हरी करणे, बाईक टॅक्सी चालवण्यापासून ते जिममध्ये ट्रेनर, फरशी आणि शौचालये स्वच्छ करण्यापर्यंत अनेकप्रकारची कामे त्याने केली. कोणतेही काम कमी न लेखता त्याने स्वावलंबन आणि आत्मसन्मानाचे धडे या कामातून गिरवले.

अखेर ऑटो रिक्षा चालविण्याचा निर्णय

चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आता राकेश बंगळुरूमध्ये ई ऑटोरिक्षा चालवतो. या कामाबरोबरच त्याने नृत्य आणि चित्रकलेचाही छंद जोपासला आहे. आपल्या आवडीनिवडी जोपासतानाच राकेश स्वतःच्या अटींवर आता आपले आयुष्य जगत आहे. स्वातंत्र्य आणि आनंद हा अनेकदा मोठ्या पगाराच्या नोकरीपलीकडेही असू शकतो, हे त्याने स्वतःच्या उदाहरणामधून दाखवून दिले आहे.