आयफोन तयार करणारी कंपनी अॅपलने भारतात उत्पादन सुरू करण्यापूर्वी सवलतींसह लेबलिंग नियमांत सूट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅपलच्या उत्पादनावर उत्पादनाशी निगडीत कोणतीही सूचना किंवा माहिती कंपनीला छापायची नाही. उत्पादनाशी निगडीत सर्व माहिती ही त्या फोन किंवा टॅब्लेटच्या सॉफ्टवेअरमध्ये देण्याची कंपनीची तयारी आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.
भारतीय लेबलिंग नियमांतर्गंत उत्पादनावर अशा पद्धतीची माहिती देणे सक्तीचे आहे. कंपनीने भारतात उत्पादन सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी सरकारला काही सवलतीही मागितल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशनने (डीआयपीपी) अॅपलची ही मागणी नोव्हेंबर महिन्यात महसूल विभाग आणि डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (डीईवायटीवाय) यांच्याकडे पाठवला होता. विशिष्ट डिझाइन हीच अॅपलच्या उत्पादनांची वेगळी ओळख आहे, असे अॅपलने म्हटले आहे. अनेक देशांमध्ये अॅपल उत्पादनावर जी माहिती असते. ती अत्यंत कमी असते. परंतु, भारतासारख्या देशात याबाबत विस्तृतपणे माहिती द्यावी लागते.

त्याचबरोबर अॅपलने अनेक प्रकारच्या सवलतीही मागितल्या आहेत. अर्थविभागाकडून याबाबत पडताळणीही केली जात आहे. लेबलिंग मुद्दा आयटी विभागाकडून पाहिले जाईल, असे एका अधिकाऱ्याने म्हटले. अॅपलने आम्हाला विशेष पॅकेजसाठी आग्रह केला आहे. संबंधित विभागांकडून यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल. कंपनीची विनंती पुढे पाठवण्यात आली आहे. सरकार विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक केल्यास सवलती देते, असे डीआयपीपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अॅपल सध्या सहा देशांमध्ये उत्पादन करते.
यापूर्वी अर्थ विभागाने अॅपलचा हा प्रस्ताव फेटाळला होता. यापूर्वी अॅपलने भारतात आऊटलेटस उघडण्यासाठी ३० टक्के स्थानिक गुंतवणूकदाराची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. कंपनीने आपली बाजू मांडताना अॅपलचे उत्पादन हे ‘स्टेट ऑफ द आर्ट’ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहेत. अशावेळी स्थानिक गुंतवणूकदाराच्या नियमांचे पालन करणे कठीण जाईल, असे अॅपलने म्हटले होते. याच वर्षी अॅपलचे सीईओ टीम कुक हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. अॅपल कंपनीसाठी भारत मोठी बाजारपेठ असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले होते. पंतप्रधान मोदींनीही कुक यांना भारतात उत्पादन सुरू करण्याची विनंती केली होती.