Apple iPhone 18 price: आजची रात्र ॲपलच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. नवीन आयफोनची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार असून, यावेळी कंपनीच्या कार्यक्रमात केवळ नवीन आयफोनच नव्हे, तर आणखी एक मोठे आकर्षण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ॲपल आज, ९ सप्टेंबर २०२६ रोजी आपला विशेष ‘सरप्राईज अँड शाईन’ कार्यक्रम आयोजित करत आहे. सर्वांचे लक्ष आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सवर असतानाच, ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनच्या आगमनामुळेही हा कार्यक्रम विशेष ठरू शकतो. त्याशिवाय ॲपल वॉच आणि एअरपॉड्सशी संबंधित काही महत्त्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. चला तर मग, जाणून घेऊया की भारतात ॲपलचा हा खास शो किती वाजता सुरू होणार आणि तो लाइव्ह कुठे आणि त्याची किंमत किती?

भारतात ॲपल इव्हेंट किती वाजता सुरू होईल?

ॲपलचा ‘सरप्राईज अँड शाईन’ कार्यक्रम स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. भारतात हा कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) रात्री १०:३० वाजता सुरू होईल. हा विशेष कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ॲपल पार्कमध्ये आयोजित केला जाणार आहे. आयफोन १८ सीरिजच्या लॉंची उत्सुकता असतानाच, कंपनी या कार्यक्रमात आपल्या इतर उत्पादनांशी संबंधित काही मोठ्या घोषणा करणार का, याकडेही टेकविश्वाचे लक्ष लागले आहे.

भारतात ॲपल इव्हेंट कुठे पाहायचा?

आयफोन १८ लाँच इव्हेंट पाहण्यासाठी वापरकर्त्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील. ॲपल आपल्या अधिकृत वेबसाइट Apple.com, ॲपल टीव्ही ॲप तसेच ॲपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) करणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोईनुसार घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा इतर कोणत्याही समर्थित डिव्हाइसवर ॲपलचा हा खास लाँच इव्हेंट लाइव्ह पाहू शकता. आयफोन १८ सीरिजसह फोल्डेबल आयफोन किंवा इतर उत्पादनांची घोषणा होते का, याची उत्सुकता ॲपलच्या चाहत्यांना लागली आहे.

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये काय खास असेल?

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स असण्याची शक्यता आहे. विविध अहवालांनुसार, दोन्ही मॉडेल्समध्ये TSMC च्या २nm तंत्रज्ञानावर आधारित A20 प्रो चिप दिली जाऊ शकते. या नव्या चिपमुळे फोनची कार्यक्षमता आणि ऊर्जा यांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच सुधारित बॅटरी लाईफ आणि नवीन कॅमेरा सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. कॅमेऱ्याबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. आयफोन १८ प्रो सीरिजमध्ये मेकॅनिकल व्हेरिएबल ॲपर्चर दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या तंत्रज्ञानामुळे कॅमेऱ्यात येणाऱ्या प्रकाशावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल आणि वेगवेगळ्या प्रकाशमान परिस्थितींमध्ये फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यास मदत होऊ शकते.

हे वैशिष्ट्य केवळ आयफोन १८ प्रो मॅक्समध्येच उपलब्ध असेल, असेही काही अहवालांमध्ये म्हटले जात आहे. त्यामुळे कॅमेरा सिस्टीममध्ये ॲपल यावेळी नेमके कोणते बदल करणार, याकडे टेकप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन आज लॉंच होणार का?

या इव्हेंटमधील सर्वांत मोठे आकर्षण ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन ठरू शकतो. सध्या विविध रिपोर्ट्समध्ये या डिव्हाइसला ‘आयफोन अल्ट्रा’ असे म्हटले जात आहे; मात्र हे त्याचे अधिकृत नाव असल्याची पुष्टी झालेली नाही. लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन पुस्तकासारख्या फोल्डेबल डिझाइनमध्ये येऊ शकतो. त्यामध्ये ७.८ इंचांचा इनर डिस्प्ले आणि ५.३ इंचांचा बाहेरील स्क्रीन असण्याची शक्यता आहे. या फोल्डेबल आयफोनमध्ये A20 प्रो चिप आणि १२ जीबी मेमरी दिली जाऊ शकते. कॅमेरा सिस्टीमबाबतही अनेक दावे समोर आले आहेत. या फोनमध्ये दोन ४८ मेगापिक्सेलचे रिअर कॅमेरे दिले जाऊ शकतात. मात्र, त्यामध्ये टेलिफोटो कॅमेरा नसल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन बाजारात दाखल झाल्यास, कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमध्ये हा एक मोठा बदल मानला जाईल. त्यामुळे हा फोन प्रत्यक्षात आजच्या कार्यक्रमात सादर केला जाणार का, याकडे जगभरातील ॲपल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्सची अपेक्षित किंमत

आयफोन १८ प्रोची सुरुवातीची किंमत $1,199 म्हणजेच अंदाजे १,४४,९०० रुपये असू शकते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉंच झालेल्या आयफोन १७ प्रोच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १,३४,९०० रुपये होती. त्या तुलनेत आयफोन १८ प्रोची किंमत सुमारे १०,००० रुपयांनी अधिक असण्याची शक्यता आहे. तर आयफोन १८ प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत $1,299 म्हणजेच अंदाजे १,५९,९०० रुपये असू शकते. सप्टेंबर २०२५ मध्ये लॉंच झालेल्या आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १,४९,९०० रुपये होती. त्यामुळे आयफोन १८ प्रो मॅक्सची किंमत मागील मॉडेलच्या तुलनेत सुमारे १०,००० रुपयांनी अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फोल्डेबल आयफोनची किंमत किती असू शकते?

ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन म्हणजेच रिपोर्ट्समध्ये ‘आयफोन ड्युओ’ किंवा ‘आयफोन अल्ट्रा’ म्हणून उल्लेख केला जाणारा फोन, तब्बल $2,299 म्हणजेच अंदाजे २,४९,९०० रुपये या सुरुवातीच्या किमतीत लॉंच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. कंपनी पहिल्यांदाच फोल्डेबल आयफोन बाजारात आणत असल्याने त्याची थेट तुलना कोणत्याही मागील आयफोन मॉडेलशी करता येणार नाही. मात्र, प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील इतर डिव्हाइसच्या तुलनेत त्याची किंमत किती असेल, याची उत्सुकता आहे. सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड ८ अल्ट्राच्या 125GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटच्या १,९९,९९९ रुपयांच्या लॉंच किमतीच्या तुलनेत, फोल्डेबल आयफोनची अपेक्षित किंमत खूपच जास्त असल्याचे दिसून येते.

आता ॲपल आपल्या या विशेष कार्यक्रमात नेमक्या कोणत्या उत्पादनांची घोषणा करते, आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये कोणते नवे फीचर्स मिळतात आणि बहुप्रतीक्षित फोल्डेबल आयफोन प्रत्यक्षात लॉंच होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ॲपलच्या या मोठ्या इव्हेंटकडे जगभरातील टेकप्रेमींचे लक्ष लागले आहे.