आयफोन निर्माता कंपनी अ‍ॅपलने चीनमधील प्राणघातक अशा कोरोना व्हायरसच्या धसक्याने ९ फेब्रवारीपर्यंत आपली स्टोअर्स, ऑफिसेस व कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘एएफपी’च्या हवाल्याने एएआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. अ‍ॅपलबरोबरच अन्य काही कंपन्यांनी देखील असा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन आत्तापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कोरोना व्हायरसचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. एका विद्यार्थ्याला या व्हायरसची लागण झाली. हा विद्यार्थी वुहान येथून परतला होता. त्याला आता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवलं होतं. एअर इंडियाने पाठवलेल्या विशेष विमानातून ३२४भारतीय दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. ज्यानंतर हे विमान दिल्लीत पोहचलं आहे.

या नागरिकांना भारतात आणल्यावर तातडीने घरी पाठवण्यात येणार नाही. या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरतं रुग्णालय उभारलं आहे. या ठिकाणी 300 जणांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांना मानेसर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.