Apple Siri anti Hindu allegations: ॲपलची व्हर्च्युअल असिस्टंट सिरी हिंदूविरोधी असल्याचा आरोप मध्य प्रदेश, उज्जैन येथील एका उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याने केला आहे. सिरीला अस्सलाम अलैकुम म्हटल्यावर ती उत्तर देते पण जय श्री राम असे म्हटल्यावर समोरुन उत्तर येत नाही, असा आरोप या कार्यकर्त्याने केला आहे. उज्जैन येथे पत्रकार परिषद घेऊन या व्यक्तीने ॲपल कंपनीवर विविध आरोप केले.

ॲपलची सिरी हिंदूविरोधी असल्याचा आरोप

माध्यमांशी बोलताना या व्यक्तीने, “ॲपलची व्हर्च्युअल असिस्टंट सिरी हिंदूविरोधी असून, ती हिंदूंचा अवमान करत आहे तसेच लाखो हिंदूंच्या भावना दुखावत आहे”, असा आरोप केला. “आयफोन भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. कंपनी हिंदूंच्या भावना दुखावत आहे. सिरीला अस्सलाम अलैकुम म्हटल्यावर उत्तर देते पण, जय श्री राम असे म्हटल्यावर समोरुन उत्तर येत नाही. उज्जैनसह देशात करोडो हिंदू लोकं आयफोन वापरतात पण, ही मोठी फसवणूक आहे”, अशी टीका त्यांनी केली.

जय श्रीरामला उत्तर मिळत नसल्याचा दावा

“आपली (हिंदूंची) माहिती ॲपल कंपनीकडे आहे. तरी देखील कंपनी आपल्याविरोधात कट करत आहे”, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. आपण केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी माध्यमांसमोरच ॲपलची व्हर्च्युअल असिस्टंट सिरीला “जय श्री महाकाल” आणि “जय श्रीराम”, अशी कमांड दिली पण, समोरुन उत्तर न आले नाही, असे दाखवले. देशात आयफोन म्हणजे स्टेट्स सिम्बॉल झाला आहे. अतिशय महागडा असला तरी अनेकजण हाफ्त्यावर आयफोन खरेदी करत आहेत.

कंपनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी

अनेकजण देशात कर्जावर आयफोन खरेदी करत आहेत. आयफोन स्टेट्स सिम्बॉल झाल आहे. तरी देखील ॲपल कंपनी आपल्या संस्कृतीचा आदर करत नाही, असा आरोप या कार्यकर्त्याने केला. त्यांनी ५ ते १० आयफोनमध्ये तपासणी करुन पाहिली पण आम्हाला असाच प्रकार अनुभवायला मिळाल्याचा दावा त्यांनी केला. यातून कंपनीची जिहादी मानसिकता दिसून येते आणि कंपनीवर बहिष्कार टाकायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.