Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी उच्च न्यायालयांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून महिला न्यायाधीशांच्या नेमणुका मोठ्या प्रमाणावर करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयांना केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्व उच्च न्यायालयांना पत्राद्वारे हे आवाहन केल्यानंतर सर्वच उच्च न्यायालयांच्या सरन्यायाधीशांनी या आवाहनाला होकार दिल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने बार अँड बेंचने दिलं आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गेल्या आठवड्यात हे पत्र पाठवल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, हे पत्र पाठवण्यामागचं कारण हे न्यायपालिकेत महिलांचं प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे न्यायपालिकेतील महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हे आवाहन केलं आहे.
दरम्यान, संसदेसमोर सादर केलेल्या आकडेवारीनुसार, उच्च न्यायालयातील ८१३ कार्यरत न्यायाधीशांपैकी केवळ ११६ महिला आहेत. हे एकूण संख्याबळाच्या १४.२७ टक्केच आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात सध्या फक्त एक महिला न्यायाधीश आहेत असं वृत्तात म्हटलं आहे.
तसेच जिल्हा न्यायपालिकेच्या स्तरावर कार्यरत संख्याबळाचा विचार केल्यास महिलांचं प्रमाण ३६.३ टक्के एवढ्या प्रमाणात आहे. मात्र, हे प्रतिनिधित्व उच्च न्यायालये किंवा सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांमध्ये त्या प्रमाणात दिसून येत नाही.
