पीटीआय, नवी दिल्ली

होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाच्या वाहतुकीमध्ये अडथळ्यांसाठी आणि त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्यामागे इराणने अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये मंगळवारी फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत या क्षेत्रात स्थिरता कशी तयार होईल, यावर भर दिला. अराघची यांच्याबरोबर चर्चा झाल्यासंबंधी त्यांनी सामाजिक माध्यमांवर टिप्पणी केली.

अराघची यांनी जयशंकर यांच्यासमोर अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात केलेल्या गुन्ह्यांची यादीच वाचली. यामध्ये मिनाब येथील मुलींच्या शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आणि इतर नागरी क्षेत्रांना लक्ष्य केल्याच्या कृत्यांचा समावेश आहे. इराणच्या सार्वभौमत्वाचे रक्षण सर्वतोपरी करण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या ठिकाणी झालेल्या अडथळ्यांसाठी इराणने अमेरिकेला जबाबदार धरले.

काँग्रेसची चर्चेची मागणी

नवी दिल्लीः पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर संसदेमध्ये सविस्तर चर्चा घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली. या युद्धामुळे देशांतर्गत ऊर्जातुटवडा निर्माण झाला असून, जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वर या संदर्भात टिप्पणी केली. पश्चिम आशियात युद्ध होऊ घातल्याच्या स्थितीची कल्पना असूनही ऊर्जासंकटावर सरकार काही करू शकले नाही, असे ते म्हणाले.