मध्य पूर्वेतील आखाती देशांत इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचे तीव्र पडसाद उमटले असून जगभरातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारताला त्याचा सर्वाधिक फटका बसला असून देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. यानंतर आता भारत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होऊ शकतो का? याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भारतातील प्रसिद्ध उद्योजक आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये बोलत असताना अनिल अग्रवाल म्हणाले की, काही विदेशी शक्तींना वाटते की, भारताने तेल आणि गॅसमध्ये स्वयंपूर्ण होऊ नये आणि भारताने आयातीवर अवलंबून राहावे.
अनिल अग्रवाल पुढे म्हणाले, भारताकडे देशांतर्गत अधिक ऊर्जा उत्पादन करण्याची संसाधने आहेत. परंतु या क्षेत्राला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदल आणि जलद निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. भारताकडे भौगोलिक आणि उद्योगाची प्रचंड क्षमता असूनही आपण महत्त्वाच्या संसाधनांची मोठ्या प्रमाणात आयात करतो.
विदेशी शक्ती भारताच्या स्वयंपूर्णतेच्या विरोधात
या कार्यक्रमात बोलत असताना अग्रवाल म्हणाले की, जागतिक ऊर्जा पुरवठादारांना भारताने स्वतःचे तेल आणि गॅस उत्पादन करावे, असे वाटत नाही. मध्य पूर्वेतील काही देश आणि इतरांना भारताने स्वतः तेल आणि गॅस उत्पादित करावा, असे वाटत नाही. म्हणूनच ते पाईपलाईन आणि मोठे टँकर बसवत आहेत. त्यांना भारता आत्मनिर्भर व्हावा असे वाटत नाही. मग त्यांचे तेल आणि गॅस कोण घेणार?
“ऊर्जा क्षेत्रात केवळ आयातीवर अवलंबून राहणे, हे भारतासमोरील एक मोठे आव्हान आहे आणि यावर मात करण्यासाठी भारताने देशाअंतर्गत शोध आणि उत्पादन वाढवले पाहिजे. भारत ऊर्जेची मागणी ९० टक्क्यांपेक्षा जास्त आयातीच्या माध्यमातून पूर्ण करतो. ९५ टक्क्यांपेक्षा जास्त तांबे आयात करतो. भारताच्या आयातीमधील सर्वात मोठा भाग भारताच्या भूगर्भात आहे, मात्र त्याचा शोध अद्याप घेतलेला नाही”, असेही अनिल अग्रवाल म्हणाले.
अनिल अग्रवाल पुढे म्हणाले, जर आपण ८०० अब्ज डॉलर्सची आयात करत असू तर त्यापैकी निम्म्याहून अधिक भूगर्भातील संसाधने आहेत. भारताचे भूगर्भशास्त्र जगातील सर्वोत्तम असून आपल्याकडे तांबे, बॉक्साईट, युरेनियम आणि हायड्रोकार्बनसह अनेक प्रमुख खनिजांचे साठे आहेत.
मुलगा गमावला तरी देशसेवेचं स्वप्न सोडलं नाही
अनिल अग्रवाल यांच्या एकुलत्या एक मुलाचे काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख विसरून अग्रवाल पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत.
इंडिया टुडेच्या कॉन्केलेव्हमध्ये बोलत असताना ते म्हणाले, “एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूनंतर मी एकतर कोसळू शकलो असतो किंवा पुन्हा उभा राहिलो असतो. मी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. आता भीती उरलेली नाही. जे करायचंय ते करणार.”
