राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीविषयी चर्चा केल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपातील कोंडी हे राजकीय नाट्य नसून ती गंभीर चर्चा आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी  शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळं त्यावर विचार केलेला नाही,” असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यातील सत्तेचं कोडं दिल्लीतील दरबारात पोहोचलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तर दुसरीकडं राज्यात निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भा शरद पवार यांनी काँग्रसेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, “राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना राज्यातील सध्याच्या जे सुरू आहे. त्यांची कल्पना दिली. यासंदर्भात पुन्हा त्यांच्याशी भेटणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लोकांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे. आमच्या सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ नाही. भाजपा-शिवसेनेनं लवकर सरकार स्थापन करावं,” असं ते म्हणाले.

शिवसेनेला पाठिंबा आणि नव्या समीकरणाविषयी बोलताना पवार म्हणाले,”शिवसेना सातत्यानं मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहे. त्यांच्या मुख्यमंत्रातून भाजपावर टीकाही केली जात आहे. त्यामुळं त्यांच्यात जे सुरू आहे. ते नाट्य नाही. शिवसेना गंभीर आहे. त्यामुळं पुढे काय घडेल हे आताच सांगू शकत नाही. राष्ट्रवादीला अद्याप शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळं त्यावर विचार केलेला नाही. आणखी वाट पाहून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू,” असंही पवार म्हणाले. राऊत यांनी १७० आकडा कुठून काढला माहिती नाही. पण, भाजपातील आमदार त्यांच्या पाठिंशी असावेत, असही शरद पवार यावेळी म्हणाले.