श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी सोमवारी युक्तिवाद पूर्ण केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी २५ मार्चची तारीख निश्चित केली आहे. दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी रोजी या प्रकरणी ६,६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
दिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील (एसपीपी) अमित प्रसाद आणि मधुकर पांडे न्यायाधीशांसमोर हजर झाले. एसपीपी अमित प्रसाद म्हणाले की, विश्वासार्ह आणि ठोस पुराव्यांद्वारे गंभीर परिस्थिती स्पष्टपणे समोर आली आहे आणि ती घटनांची साखळी बनवतात. घटनांच्या साखळीमुळे आरोपीच्या अपराधाबद्दल एक निष्कर्ष निघतो. पूनावाला यांचे कायदेशीर सहाय्य सल्लागार (एलएसी) वकील जावेद हुसेन यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत दंडाधिकारी न्यायालयाने हे प्रकरण सत्र न्यायालयात सोपवले होते.