नवी दिल्ली : कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. राज्य सरकारनं हिजाबला घातलेल्या बंदीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी आता पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

या प्रकरणी सुनावणी लांबत असल्याबद्दल न्या. हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती. बुधवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना आज, गुरूवारी केवळ एक तास देण्यात येईल, असेही बजावले होते. या अखेरच्या युक्तिवादात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेचा याचिकाकर्त्यांनी आधार घेतला. हिजाबवर बंदी घालून मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला. सरकारने विद्यार्थ्यांच्या पोशाखापेक्षा शिक्षणावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असा युक्तिवादही याचिकाकर्त्यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. मुस्लिम मुलींनी हिजाब घेतल्याने कोणत्या मुलभूत हक्कांवर गदा येते, हे सरकारी पक्ष सांगू शकला नसल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील हुझेफा अहमदी म्हणाले.