पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) लोकसांख्यिकीत बदल केला असून अशापद्धतीने ते काश्मिरी लोकांची ओळख योजनाबद्ध पद्धतीने नष्ट करत असल्याचा आरोप लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केला आहे. करतारपूर मार्गिकेच्या शिलान्यासानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध प्रस्थापित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये थोडीशी शांतता प्रस्थापित झाली तरी सुरक्षा दलांना परत बोलावण्याच्या सूचनांवर असहमती दर्शवली. सुरक्षा दल पुन्हा माघारी बोलावले तर दहशतवाद्यांना आपले नेटवर्क पुन्हा सुरु करण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने दबाव ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. रावत यांनी दहशतवाद्यांची अंत्ययात्रा काढण्यास देण्यात आलेल्या परवानगीवर चिंता व्यक्त केली. या कृतीवरुन दहशतवादी हुतात्मा झाल्याचे दाखवले जाते. त्यामुळे अधिक लोकांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

पीओकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, पाकिस्तानने धुर्तपणे पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकसांख्यिकीत बदल केला आहे. त्यामुळे काश्मिरी कोण आहे, हे निश्चित केले जाऊ शकत नाही. गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोकही हळूहळू तिथे येऊन राहत आहेत. आपल्या इकडचे काश्मिरी आणि दुसऱ्या बाजूच्या काश्मिरींमधील ओळख असलेल्या वस्तू हळूहळू नष्ट केल्या जात आहेत. या मुद्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे.