Army Chief General Upendra Dwivedi Operation Sindoor 2.0 Updates : पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) ऐतिहासिक १५० व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाप्रसंगी बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी देशाच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. “जर ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ची वेळ आली, तर त्यासाठी देशाची तिन्ही सैन्यदले पूर्णपणे सज्ज आहेत,” अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशाच्या संरक्षण सज्जतेवर आणि भविष्यातील युद्धाच्या आव्हानांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. पुढील दोन ते तीन वर्षांत भारतीय सैन्यात ‘थिएटरलायझेशन’ (एकात्मिक युद्ध कमांड) प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘ऑपरेशन सिंदूर’ने नवा वस्तुपाठ घालून दिला

एनडीएच्या संचलनाचे मुख्य अतिथी म्हणून कॅडेट्सना संबोधित करताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतावर होणाऱ्या कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला आपण कसे चोख उत्तर देतो, याचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. एनडीएतून उत्तीर्ण होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी हाच उच्च दर्जा कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. या दिमाखदार सोहळ्यात लष्करप्रमुखांनी कॅडेट्सच्या अंतिम संचलनाचे निरीक्षण केले आणि चमकदार कामगिरी करणाऱ्यांना पदके प्रदान केली.

‘ऑपरेशन सिंदूर २.०’ आणि आधुनिक युद्धाची आव्हाने

‘ऑपरेशन सिंदूर’च्या सद्यस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लष्करप्रमुख म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही पूर्णपणे संपलेले नाही, सध्या केवळ युद्धजन्य परिस्थिती तात्पुरती थांबली आहे. जर ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ची परिस्थिती निर्माण झाली, तर त्यासाठी भूदल, नौदल आणि वायूदल अत्यंत प्रभावीपणे तयारी करत आहेत. सध्या आमचा भर तिन्ही दलांमधील समन्वय वाढवण्यावर आहे.” भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलत असल्याचे स्पष्ट करत जनरल द्विवेदी पुढे म्हणाले, “पुढील युद्ध हे केवळ जमीन, पाणी किंवा आकाशापुरते मर्यादित नसेल. आताच्या आणि भविष्यातील युद्धात अंतराळ (Space), सायबर (Cyber) आणि कॉग्नेटिव्ह (मानसिक/बौद्धिक) क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आम्ही स्वतःला याच आधुनिक युद्धासाठी सज्ज करत आहोत.”

‘इन्फर्मेशन वॉरफेअर’ आणि देशाचा विश्वास

माहिती युद्ध म्हणजेच ‘इन्फर्मेशन वॉरफेअर’वर बोलताना लष्करप्रमुखांनी देशवासीयांच्या विश्वासाला सर्वाधिक महत्त्व दिले. ते म्हणाले, “विजय हा नेहमी मनात असतो, केवळ रणभूमीवर नाही. माहिती युद्ध तेव्हाच यशस्वी होते जेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो आणि अधिकृत माहिती देणाऱ्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवतो. जर देशात असा परस्परांवर विश्वास असेल, तर मी तुम्हाला खात्री देतो की विजय नेहमी आपलाच होईल.”

सैन्यदलांचे एकत्रिकरण(थिएटरलायझेशन) योग्य मार्गावर, पुढील ३ वर्षांत बदल दिसणार

भारतीय सैन्यदलांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेबाबत बोलताना जनरल द्विवेदी यांनी ही प्रक्रिया अगदी योग्य मार्गावर असल्याचे सांगितले.

  • अहवाल सादर: चीफ ऑफ स्टाफ कमिटीमध्ये थिएटरलायझेशनबाबतची सर्व चर्चा पूर्ण झाली असून, याचा अंतिम अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
  • समन्वयाची भूमिका: सद्यस्थितीत विविध संबंधित घटकांकडून या अहवालाचे पुनरावलोकन केले जात आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी मिळून सर्व दलांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे.
  • जबाबदाऱ्यांचे विभाजन: या नव्या रचनेत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख हे सैन्याची उभारणी, प्रशिक्षण आणि त्यांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार असतील, तर ‘थिएटर्स कमांडर्स’ प्रत्यक्ष युद्ध मोहिमांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळतील.

“नवे सीडीएस (CDS) या प्रक्रियेला वेगाने पुढे नेतील आणि पुढील २ ते ३ वर्षांत ही एकात्मिक युद्ध पद्धती प्रत्यक्ष जमिनीवर कार्यरत झालेली आपल्याला पाहायला मिळेल,” असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला.