भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इशारा देत सुनावलं होतं. “जर पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना ‘भूगोलाचा भाग राहायचंय की इतिहासाचा’ हे स्वतःच ठरवावं लागेल,” अशा कडक शब्दांत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. त्यानंतर आता उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी (३० मे) एका कार्यक्रमात बोलताना ऑपरेशन सिंदूर २.० बाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर २.० साठी भारत सज्ज’, असल्याचं उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. तसेच लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं सांगत सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख त्यांनी युद्धविराम असा केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बोलताना लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं की, “भारत ऑपरेशन सिंदूर २.० साठी तयारी करत आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.” दरम्यान, उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानचं थेट नाव घेतलं नसलं तरी भारताच्या लष्करी तयारीवर प्रकाश टाकत एक मोठा संदेश दिला आहे. तसेच जर नवीन ऑपरेशनची गरज पडली तर फक्त लष्करच नाही तर हवाई दल आणि नौदलही सज्ज असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर २.० बाबत उपेंद्र द्विवेदी काय म्हणाले?

“ऑपरेशन सिंदूर २.० झाल्यास भारतीय लष्कराचे तिन्ही दल तयारी करत आहेत. सध्या आम्ही तिन्ही दलांमधील समन्वय वाढवण्यावर आणि पुढील युद्धासाठी स्वतःला सज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. युद्धभूमी इतकी पारदर्शक असते की प्रत्येक हालचाल समोरच्या बाजूला कळत असते. त्यामुळे आपल्या सैनिकांचं तसेच सीमावर्ती भागातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली तैनाती आणि सुरक्षा या बाबतीत आपल्याला खूप सावधगिरी बाळगावी लागत असते”, असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे.

“माहिती युद्ध तेव्हाच यशस्वी होतं, जेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो आणि लोकांवर विश्वास ठेवतो. जर असं झालं तर मी तुम्हाला खात्री देतो की जो देश एकमेकांवर आणि या सर्व संबंधित घटकांवर विश्वास ठेवतो, तो नेहमीच युद्ध जिंकतो”, असंही लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे.