प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात बळी पडलेले लान्सनाईक सुधाकरसिंग बघेल यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी शुक्रवारी त्यांचे सांत्वन केले. येथील धाडिया गावात विक्रमसिंग यांनी सुधाकरसिंग यांच्या पत्नीची भेट घेतली.बहादूर जवानाच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आपण येथे आलो आहोत, असे विक्रमसिंग यांनी वार्ताहरांना सांगितले. सुधाकरसिंग यांची पत्नी दुर्गासिंग यांची भेट घेऊन विक्रमसिंग यांनी त्यांना, तुमचे पती ‘सिंह’ होते असे सांगितले आणि त्यांच्या पुत्रानेही लष्करात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपण थेट येऊन मला भेटा, असे विक्रमसिंग यांनी दुर्गासिंग यांना सांगितले. सुधाकरसिंग यांचा थोरला भाऊ सत्येंद्रसिंग यांना येथील जेपी सिमेंट कारखान्यात नोकरी देण्याबाबतचे नियुक्तीपत्रही विक्रमसिंग यांनी सोबत आणले होते. सुधाकरसिंग यांच्या नावाने सैन्य भरती मेळावा येत्या जुलै महिन्यात सिधी येथे घेण्यात येईल, असेही लष्करप्रमुख म्हणाले.