Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात लष्कराने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. किश्तवाडमध्ये रविवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जैशच्या एका कमांडरसह २ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

किश्तवाडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून दहशतवादाच्या विरोधात मोठी मोहिम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान किश्तवाडमधील घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या एका टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.

भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने एका निवेदनात म्हटलं की, “‘ऑपरेशन त्राशी १’ अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पोलीस आणि इतर गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या विश्वासार्ह गुप्त माहितीनंतर जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.”

सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईच्या ठिकाणाहून दोन एके-४७ रायफल आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही लष्कराने सांगितलं होतं की, जिल्ह्यातील चतरू भागात चकमक झाली होती.

अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद गटाशी संबंधित दोन पाकिस्तानी दहशतवादी तिथे उपस्थित असल्याची माहिती पथकांना मिळाली होती. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका मातीच्या घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिक जवळ येताच गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात चतरू वनपट्ट्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जवळपास सहा वेळा गोळीबार झाले होते. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला होता.