विरोधकांची केंद्र सरकारवर चौफेर टीका
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना यमुनेच्या पर्यावरण संवेदनशील असलेल्या पूर पठारांच्या भागात ११ ते १३ मार्चदरम्यान सांस्कृतिक महोत्सव घेण्यास परवानगी दिली नव्हती, असा खुलासा केंद्रीय जलसंपत्ती मंत्रालयाने केला आहे. सरकारने मात्र संसदेत श्री श्री रवीशंकर यांनी सर्व परवाने घेतले होते व बेकायदेशीर काही केलेले नाही, असे सांगितले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या महोत्सवासाठी जाण्याचे टाळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. राष्ट्रीय हरित लवादाला सरकारने सांगितले की, आम्ही या कार्यक्रमास परवानगी दिलीच नव्हती. राज्यसभेतही विरोधी पक्षांनी या खासगी कार्यक्रमासाठी भारतीय लष्करी दलांची मदत देऊ केल्याबद्दल सरकारवर चौफेर टीका केली.
राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आयोजित केलेल्या या महोत्सवाने पर्यावरणाची हानी होणार आहे, तरीही पर्यावरण परवान्यांच्या संदर्भात सरकारने कुठलेही प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. या कार्यक्रमाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचे मूल्यमापन केले होते का, अशी विचारणा हरित लवादाने दिल्ली सरकार, केंद्र सरकार व दिल्ली विकास प्राधिकरण यांना केली आहे.

राजकीय पक्षांनी जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रश्नावर राजकारण करू नये. सर्व संस्कृती, देश, धर्म, विचारसरणी यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाबाबत आपण संवेदनशील आहोत
– श्री श्री रविशंकर